तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजीचे वारे
वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील पहिल्या सत्रात सोमवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे मोठी तेजी नोंदवून बंद झाले आहेत. दरम्यान कच्या तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि सकारात्मक तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली बाजारात तेजी कायम राहिली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 544.39 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 78,639.03 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 390.70 अंकांनी मजबूत होत 24,774.30 वर बंद झाला आहे. वरील कारणांसह आयटी आणि एफएमसीजीच्या कंपन्यांमधील समभागांनी नोंदवलेल्या तेजीचाही लाभ भारतीय बाजाराला झाला आहे.
निफ्टीमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) हे सर्वाधिक वाढलेले शेअर्स होते. त्याचबरोबर, व्यापक बाजारातही खरेदीचे वातावरण कायम आहे. निफ्टी मिडकॅप 1.21 टक्क्यांच्या आणि निफ्टी स्मॉलकॅप 1.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांमधील कामगिरी
निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी पीएसयू बँक्स हे सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे, निफ्टी मीडिया हे सर्वाधिक घसरण झालेले क्षेत्र होते. त्याच वेळी, अलीकडील तेजी आणि तिमाही निकालांनंतर फार्मा स्टॉक्समध्ये नफ्यात सुधारणा दिसून आली. दरम्यान जागतिक पातळीवर युद्धविरामांच्या पुन्हा सुरु झालेल्या चर्चेमधून आगामी काळात भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक मजबूत कामगिरी होणार असल्याचे संकेत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहेत.
बाजारातील या तेजीचे कारण काय आहे?
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या अपेक्षेने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे बाजाराला दिलासा मिळाला आहे. यामुळे महागाई आणि कंपन्यांच्या नफ्याबद्दलची काही चिंता कमी झाली. याव्यतिरिक्त, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीत झालेली सुधारणा आणि रुपयाचे बळकटीकरण यामुळेही बाजारातील भावना सुधारली. तथापि, अमेरिकेतील बॉण्डवरील परतावा (यील्ड) उच्च पातळीवर असल्याने, उदयोन्मुख बाजारपेठांमधील विदेशी गुंतवणुकीच्या प्रवाहावर लक्ष ठेवले जाईल.