For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात परतला तेजीचा माहोल

06:36 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात परतला तेजीचा माहोल
Advertisement

सेन्सेक्स 560 अंकांनी तेजीत, बँकिंग समभाग चमकले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार चांगल्या तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला. सरकारी बँकांच्या चमकदार कामगिरीमुळे सेन्सेक्स 560 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 560 अंकांच्या तेजीसोबत 73648 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 189 अंकांनी वाढत 22336 अंकांवर बंद झाला. दिवसभरात टाटा कंझ्युमर्सचे समभाग तेजीमध्ये पहायला मिळाले. तर एनटीपीसीचे समभाग 2 टक्के घसरणीत राहिले होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग तेजीसोबत बंद झाले तर 4 समभाग घसरणीत राहिले होते. सर्व 16 क्षेत्रांच्या निर्देशांकामध्ये सोमवारी तेजी अनुभवायला मिळाली. यातही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक 3 टक्के तेजीत होता. कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्राचा निर्देशांक 2.4 टक्के, फार्मा 1.30 टक्के आणि हेल्थकेअर क्षेत्राचा निर्देशांक 1.08 तेजीसोबत बंद झाला होता. बँक, ऑटो, फायनान्सीयल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, माध्यम, रियल्टी, धातू आणि खासगी बँकांच्या निर्देशांकांनी मजबूत कामगिरी नोंदवत शेअर बाजाराला भक्कम साथ दिली.

बीएसई स्मॉलकॅप व निफ्टी मिडकॅप-100 1 टक्का तेजीसमवेत व्यवहार करीत होता. टाटा कंझ्युमर आणि बीपीसीएल या कंपन्यांचे समभाग सोमवारी सर्वाधिक 3 टक्के वाढत बंद झाले. आयशर मोटर्स आणि लार्सन टूब्रो यांनीसुद्धा तीन टक्क्यांची तेजी नोंदवली होती. श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प आणि अॅक्सिस बँक यांनी 2.5 टक्के तेजी राखत बाजाराला आधार दिला. दुसरीकडे एनटीपीसी, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि इंडस्इंड बँक यांच्या समभागांनी मात्र निराशादायी कामगिरी केली.

व्होल्टास, मोतीलाल ओसवाल, हिंद कॉपर, सिमेन्स आणि जिओ फायनान्शीअल या कंपन्यांच्या समभागांनी 52 आठवड्यानंतर उच्चांकी झेप घेतली होती. जिओ फायनान्शीअल कंपनीचा समभाग सोमवारी 3 टक्के इतका वाढला होता. शुक्रवारी कंपनीने नफ्याचा अहवाल जाहीर केला होता. चांगल्या नफ्यामुळे समभाग 3.49 टक्के वाढीसह 383 रुपयांवर दिवस अखेर बंद झाला होता.

जागतिक बाजारात तेजी

जागतिक बाजारामध्ये विचार करता अमेरिकेमध्ये मिश्र कल पहायला मिळाला. डोव्ह जोन्स 177 अंकांनी तेजीत तर नॅसडॅक 319 अंकांनी घसरणीत होता. युरोपातील बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. आशियाई बाजारामध्येसुद्धा तेजी कायम होती. निक्केई 370, हँगसेंग 277 आणि कोस्पी 37 अंकांनी तेजी राखत व्यवहार करीत होते. शांघाय कंपोझिट मात्र 20 अंकांनी नुकसानीत होता.

Advertisement
Tags :

.