सिद्धिकीच्या बांधकामांवर बुलडोझर
म्हापसा एकतानगरात बळकावली 21 चौ. मी. जमीन : कोणत्याही कागदपत्रांविना उभारली सहा बांधकामे
म्हापसा : एकतानगर म्हापसा येथे कुख्यात सिद्धिकी उर्फ सुलेमान खान याने बळकावलेल्या जमिनीवरील सहा बेकायदा बांधकामे काल शुक्रवारी सकाळी धडक कारवाईत जमिनदोस्त करण्यात आली. म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, अभियंतावर्ग व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती पूर्णत: पाडण्यात आली. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरु केलेल्या आणि गाजत असलेल्या ‘बुलडोझर अॅक्शन’ पद्धतीनुसार ही बांधकामे पाडण्यात आली. सिद्धिकी उर्फ सुलेमान महम्मद खान (वय 46) हा अट्टल गुन्हेगार असून अनेक मालमत्ता फसवणुकीच्या प्रकारणांत तसेच इतर गुह्यात सामील आहे. सध्या तो फरार आहे. सुलेमान याच्या विऊद्ध म्हापसा, वाळपई, हणजूण पोलिसस्थानकांत मालमत्ता हडप व फसवणुकीचे गुन्हे प्रलंबित आहेत.
एकतानगरमधील 20 हजार 819 चौ. मीटर जमीन उपनिबंधकांच्या बनावट रबर स्टॅम्पचा वापर करून व बनावट कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासवून सिद्धिकीने आपल्या नावावर करुन घेतली होती. याप्रकरणी सिद्धिकी उर्फ सुलेमान खान व इतरांविऊद्ध म्हापसा पोलिसांनी सप्टेंबर 2020 मध्ये भादंसंच्या कलमांतर्गत बनावटगिरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेट्यो यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. भूखंड करून विक्रीस काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
सर्व बांधकामे पूर्णत: बेकायदा : शेटकर
म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर म्हणाले की, आमच्याकडे याबाबत लेखी तक्रार आल्यावर पालिका निरीक्षक शेखर गांवस यांनी त्याबाबत तपासणी केली असता जमीन बळकावून त्यात बेकायदेशीर 6 पक्की बांधकामे उभारल्याचे fिनदर्शनास आले. दोन मोठी पक्की घरे तसेच टँक बांधकामांचा त्यात समावेश आहे. अहवालाप्रमाणे चौकशी व तपासणी करून पंचनामा करण्यात आला. पालिकेने सिद्धिकी सुलेमान खान याला नोटिस बजावली, मात्र तो चौकशीला हजर राहिला नाही. चौकशी संपली तेव्हा कळले की ही बांधकामे पूर्णत: बेकायदेशीर आहेत. कोणतीच कागदपत्रे त्याच्याकडे नाहीत. त्यामुळे पालिकेने नोटिस बजावून अखेर ही बांधकामे जमिनदोस्त केली.
सिद्धीकीला बजावली होती नोटिस
गेल्या 17 सप्टेंबर 2024 रोजी सिद्धिकी खान यास नोटिस बजावून येत्या 15 दिवसांच्या आत ही बांधकामे स्वत:हून पाडण्याचा आदेश जारी केला होता. तसे करण्यास अपयशी ठरल्यास पालिकेकडून सदर बांधकामे पाडून त्यासाठी येणारा खर्च त्याच्याकडूनच वसूल करण्यात येईल, असे सिद्धीकीला नोटिशीद्वारे बजावले होते. शुक्रवारच्या या धडक कारवाईत एकूण 20 हजार 819 चौरस मीटर जमीन मुक्त करण्यात आली. पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, अभियंता आगुस्तीन मिस्किता व प्रशांत नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने अतिक्रमण हटाव पथकाच्या सहाय्याने ही कारवाई पूर्णत्वास नेली. पालिकेचे इतर अधिकारी तसेच संयुक्त मामलेदार जेनिस परेरा व म्हापसा पोलिसांचे पथक उपस्थित होते.