For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News | झाडगाव अतिक्रमणांवर २८ रोजी बुलडोझर

03:56 PM May 20, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news   झाडगाव अतिक्रमणांवर २८ रोजी बुलडोझर
Advertisement

५० बेकायदेशीर बांधकामधारकांना प्रशासनाने ‘अंतिम नोटीस’ बजावली

Advertisement

रत्नागिरी : शहरानजीकच्या झाडगाव एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणधारकांवर अखेर एमआयडीसी प्रशासनाने बडगा उचलला आहे. येथील सुमारे ५० बेकायदेशीर बांधकामधारकांना प्रशासनाने मंगळवारी ‘अंतिम नोटीस’ बजावली आहे. आगामी २८ मे रोजी ही सर्व अनधिकृत बांधकामे कडक पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली जाणार आहेत.

या कारवाईवर कोणीही न्यायालयात जाऊन ‘स्थगिती’ आणू नये, यासाठी एमआयडीसीने आधीच न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल करून अतिक्रमणधारकांचे कायदेशीर मार्गही बंद केले आहेत.

Advertisement

झाडगाव एमआयडीसीच्या हद्दीतील शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर चिऱ्यांची अनधिकृत बांधकामे करून आणि बेकायदेशीर वीज जोडण्या घेऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. या संदर्भात एमआयडीसीने संबंधितांना दिलेली ही तिसरी आणि अंतिम नोटीस आहे.

यापूर्वीच त्यांना ही बांधकामे हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता प्रशासनाने केवळ ७ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. हा कालावधी संपताच २८ मे रोजी रत्नागिरी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ‘सर्च ऑपरेशन’ राबवून ही अतिक्रमणे पाडली जातील.

त्यासाठी पोलीस अधीक्षकांना आधीच संरक्षणाचे पत्र देण्यात आले आहे. जेव्हा एमआयडीसीचे कर्मचारी या अंतिम नोटिसांचे वाटप करण्यासाठी मंगळवारी घटनास्थळी गेले, तेव्हा एका स्वयंघोषित स्थानिक पुढाऱ्याने शासकीय प्रक्रियेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

अधिकारी स्वतः नोटीस द्यायला का आले नाहीत? असा उद्धट प्रश्न विचारत या पुढाऱ्याने कर्मचाऱ्यांशी आरेरावीची भाषा केली. परंतु, एमआयडीसी प्रशासनाने त्याच्या या दबावाला भीक न घालता आपली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून ‘कॅव्हेट’ दाखल!

एमआयडीसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केल्यामुळे आता या कारवाईला कोणताही कायदेशीर अडथळा आणणे अतिक्रमणधारकांना शक्य होणार नाही. त्यामुळे येत्या २८ तारखेला एमआयडीसीचा जेसीबी झाडगावमधील या ५० बेकायदेशीर बांधकामांवर फिरणार हे आता पूर्णपणे निश्चित झाले आहे.

Advertisement
Tags :

.