मिरजेत अतिक्रमणांवर बुलडोझर
मिरज
गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या महापालिका अतिक्रमणविरोधी कारवाईने सोमवारी उग्र रुप घेत शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर बुलडोझर चालविला. कर्मवीर भाऊराव पाटील चौक आणि शासकीय रुग्णालय परिसरात ३८ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पाच अतिक्रमणांचा जाग्यावरच चक्काचूर करण्यात आला. तसेच काही अतिक्रमणांचे सांगाडे जप्त केले. अतिक्रमणधारकांना कारवाईच्या नोटीसाही दिल्या. महापालिका आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने ही धडक कारवाई केली.
गांधी यांनी सोमवारी महापालिका मिरज विभागीय कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत बेकायदेशीर अतिक्रमणांचा अहवाल पाहिल्यानंतर आयुक्त संतप्त झाले. त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील चौक आणि मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. पाच हातगाड्या जाग्यावरच चक्काचूर केल्या. १८ शेड काढून टाकलेतसेच १५ गाड्या हलविण्यात आल्या. संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला.
स्वतः आयुक्त आणि सर्व टीम रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. काहींनी राजकीय बळाचा वापर करत कारवाईला विरोध दर्शविला. महापालिका अधिकाऱ्यांनी या विरोधाला न जुमानता कडक कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, विजया यादव, सहा. आयुक्त अनिस मुल्ला, अतिक्रमण टीम यांनी काही वेळात कार्यवाही पूर्ण करून अतिक्रमण मुक्त रस्ता केला. दरम्यान, कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज शासकीय रुग्णालय रस्त्यावर फुटपाथवर प्रचंड अतिक्रमण झाल्याने नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय अपुरा झाला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन अतिक्रमणांवर कारवाई केली असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. इथून पुढे या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी उपायुक्त स्मृती पाटील यांना निरीक्षण अधिकारी म्हणून नेमल्याचेही त्यांनी सांगितले.