कुचेलीतील 140 पैकी 36 घरांवर बुलडोझर
कोणत्याही परवान्यांशिवाय पूर्णत: बेकायदेशीर घरे : सार्वजनिक स्मशानभूमीसाठी राखीव ठेवलेली जमीन, अनेकांना पैसे देऊन बेकायदेशीरपणे बांधली घरे
म्हापसा : खडपावाडा-कुचेली, म्हापसा येथील सरकारने संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या बांधलेली तब्बल 140 घरे पाडण्याची कारवाई काल मंगळवारी सुरू झाली असून दिवसभरात 36 घरे पाडण्यात आली. स्मशानभूमीसाठी संपादित केलेल्या जमिनीत ही घरे बांधली होती. मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ही घरे पाडण्याचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू केले. उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या समवेत मामलेदार, एनजीपीडीए व इतर अधिकारी उपस्थित होते.
स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण
म्हापसा शहर पीटी शीट क्रमांक 1, चलता क्रमांक 10/3 मधील 9911 चौ.मी. आणि पीटी शीट क्रमांक 2, चलता क्रमांक 11/1 मधील 20276 चौ.मी. अशी एकूण 30 हजार 187 चौ. मी. कुचेली कोमुनिदादची जमीन सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी 2017 मध्ये सरकारतर्फे उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने संपादित केली होती. या जमिनीत बेकादेशीररित्या 140 पक्की घरे बांधली गेली आहेत. त्यातील 36 घरे काल पाडण्यात आली. या बेकायदेशीर घरांवर कारवाई झाली असली तरी लाखो ऊपये घेऊन या जागेत घरे बांधण्यास लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती मात्र मोकाट आहेत. कोमुनिदाद किंवा सरकारने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
घरे पाडण्याची कारवाई सुरू असताना दिवसभर मामलेदार अनंत मळीक यांच्या समवेत एनजीपीडीएचे अभियंता तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच उपअधीक्षक संदेश चोडणकर, म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, हणजूण निरीक्षक सूरज गावस हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित होते.
पैसे घेतलेल्यांची नावे उघड
ज्यांनी ही बेकायदेशीर घरे बांधली आहेत, त्यांच्या दाव्यानुसार ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली त्यांनी ही जमीन पंचायतीची असल्याचे भासविले. सर्व कागदपत्रे कायदेशीर करून देतो असे आश्वासन दिले. त्यामुळे पदरमोड करून घामाकष्टाचे पैसे गुंतविले. मात्र आमच्या लोकप्रतिनिधींसह त्यांच्या टीमने फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही केला. यावेळी जमलेल्या महिलांनी त्यांच्याकडून पैसे घेतलेल्यांची, अधिकाऱ्यांची, नगरसेवकांची नावे पत्रकारांसमोर कॅमेरात बोलताना उघड केली. समाजसेवक राजन घाटे यांनीही बेकायदेशीर घरे पाडत असताना घटनास्थळी येऊन पाहणी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे. ज्या लोकांनी येथे बेकायदेशीर घरे बांधण्यासाठी पैसे घेतले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. या जागेतील सर्व बेकायदेशीर घरे पाडण्यात येतील, असे बार्देशचे उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.