कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगोल्डातील 12 बेकायदा घरांवर बुलडोझर

12:24 PM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवसभर घटनास्थळी तंग वातावरण : एकूण 22 घरांवर होणार कारवाई,कारवाईविरुद्ध आत्महदनाचा प्रयत्न,दिवसभर पोलिस व नागरिकांत तणाव

Advertisement

म्हापसा : बार्देश तालुक्यातील सांगोल्डा पंचायतक्षेत्रातील 12 बेकायदेशीर  घरांवर काल शुक्रवारी स्थानिक कोमुनिदादने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुलडोझर चढविला. ही घरे बेकायदेशीर असल्याचा ठपका कोमुनिदादने ठेवला होता. त्यानुसार ती पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला बेकायदा घरांच्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निवाडा कायम ठेवल्याने शेवटी काल शुक्रवारी ही बेकायदा घरे पाडण्याची कारवाई करण्यात आली. कारवाईच्यावेळी प्रशासन तसेच सरकारला शिव्याशाप देण्यात आले. काही महिलांनी पोलिसांच्या अंगावर धावण्याचा प्रयत्न केला. एका युवकाने आपल्या अंगावर केरोसीन ओतून आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला. कौले काढताना छतावरून खाली कोसळून मैनुद्दीन बाशु हा जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला गोमनॅकोत नेण्यात आले. यावेळी वातावरण बरेच तंग झाले होते. महिलांनी एकच आक्रोश केला होता. उपअधीक्षक विश्वास कर्पे व निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या उपस्थितीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisement

 बारा बेकायदा बांधकामे जमिनदोस्त

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर गोवा कोमुनिदादच्या प्रशासकांनी सांगोल्डा येथील कोमुनिदाद मामलत्तेवरील बेकायदा बांधकामे पाडण्याचे काम काल शुक्रवारी सकाळी हाती घेतले. येत्या 25 एप्रिलपर्यंत या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. तब्बल 22 अनधिकृत बांधकामे असून शुक्रवारी दुपारपर्यंत 12 बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.

गोवा खंडपीठाचा निवाडा कायम

कोमुनिदाद व या घरमालकांमध्ये 2012 पासून कायदेशीर लढाई सुरू होती. सांगोल्डा येथील सर्व्हे क्र. 81/1 मधील ही 22 बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. याविषयी या घरमालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय कामय ठेवला, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

सकाळपासून दिवसभर कारवाई

ही बांधकामे पाडण्यासाठी कोमुनिदाद प्रशासकांना उपजिलहाधिकाऱ्यांनी कारवाईपथक उपलब्ध करून दिले. सकाळी 9.30 वा. कारवाई पथक व मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी घरमालकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी वेळ देण्यात आली. काहींनी यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. सकाळपासून दिवसभर ही कारवाई सुरु होती. ज्या बांधकामांवर कारवाई झाली, त्यातील अनेकांनी दावा केला की, मागील 40 ते 50 वर्षांपासून आम्ही इथे वास्तव्यास आहोत. अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हास ही घरे बांधताना विश्वासात घेतले आणि आज शेवटच्या क्षणी अशाप्रकारे आम्हाला वाऱ्यावर सोडले. काहीजणांच्या दाव्याप्रमाणे त्यांचा व त्यांच्या मुलाबाळांचा जन्म सांगोल्डामध्ये झालेला आहे.

मंत्री, आमदारांवर कारवाई का नाही?

दुपारच्यावेळी साळगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पंच नीळकंठ नाईक, माजी पंच उल्हास मोरजकर उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना साळगावकर म्हणाले की, काही मंत्री, आमदारांच्या विरोधातही न्यायालयाचे निर्देश आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही. येथील लोकांच्या पुनर्वसनाचा विचार सरकारने करायला पाहिजे. गेल्या 40 वर्षापासून हे लोक याठिकाणी वास्तव्य करून आहेत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून या लोकांचा विचार व्हायला पाहिजे. सरकारने तसेच स्थानिक आमदारांनी पुढाकार घेत या लोकांना इतरत्र निवारा देण्याची जबाबदारी स्वीकारावी. या लोकांना मुद्दामहून टार्गेट केले जात आहे, असा आरोप जयेश साळगावकर यांनी केला.

घरावरून पडून मैनुद्दीन बाशू जखमी

बेकायदेशीर घरे पाडण्याच्या प्रक्रियेवेळी मैनुद्दी बाशू आपल्या घराच्या छतावर चढून कौले काढताना घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. सायंकाळच्या वेळेस ही घटना घडली. त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. खाली पडल्यावर मैनुद्दीन बाशू बेशुद्ध झाला. त्याला तसाच उचलून गाडीपर्यंत नेत असताना महिलांनी एकच आक्रोश केला.

लोकसभा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार असा निर्धार या बेघरांनी केला आहे. सरकारने आम्हाला इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी. फक्त निवडणुकांपुरती आमची मते मागण्यासाठी लोकप्रतिनिधी आपल्या घरी येतात. सरकर बनवण्यासाठी आमची गरज असते का? आमच्यावर हा अन्याय का? असा प्रश्न संबंधितांनी उपस्थित केला.

पोलीस नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक

सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान वातावरण बरेच तंग झाले. काहीनी जेसीबी आड येऊन काम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस व नागरिक यांच्यामध्ये झटापट झाली. पोलिसांनी यावेळी तिघांना ताब्यात घेतले. मात्र महिलांचा आक्रोश पाहून त्यांना सोडण्यात आले. काहीवेळ उपअधीक्षक विश्वास कर्पे व निरीक्षक सोमनाथ माजिक यांना नागरिकांनी घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपअधीक्षक कर्पे व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article