कुचेलीतील बेकायदेशीर घरांवर उद्या बुलडोझर
स्मशानभूमीच्या जागेवर उभारलेली घरे
म्हापसा : कुचेली-म्हापसा येथील सार्वजनिक स्मशानभूमीसाठी संपादीत केलेल्या सरकारी जागेत बेकायदेशीरपणे बांधलेल्या 140 घरांना बार्देशचे उपजिल्हाधिकारी कबीर शिरोडकर यांनी नोटिस बजावली आहे. उद्या मंगळवारी दि. 12 रोजी ही बेकायदा घरे पाडण्यात येणार आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी मामलेदार व संयुक्त मामलेदारांना संबंधित अतिक्रमणावर कारवाईस सज्ज रहावे, असा आदेश दिला आहे. पणजी येथील अतिक्रमण हटाव पथकालाही सज्जतेचे आदेश दिले आहेत. खडपावाडा कुचेली येथे सरकारने संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून बांधलेली बेकायदा घरे जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरू होणार आहे. ही कारवाई सुलभ व्हावी यासाठी संबंधित घरे रिकामी करावी, असा आदेश सदर बेकायदेशीर घरे बांधणाऱ्या सर्व संबंधितांना जारी केला आहे. काही घरांच्या दरवाजावर नोटिसा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
किती घरांवर कारवाई होईल?
दरम्यान, 140 बेकायदा घरांपैकी सुमारे 60 घरे संपादित केलेल्या जागेत आहेत. मात्र ती घरे कोणाची ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बेकायदेशीर घरे बांधणाऱ्यांचा फायदा घेऊन एका नगरसेवकाने व कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. जर सदर घरे पाडण्याची कारवाई झाली तर पुन्हा कोमुनिदाद जागेत समावून घेण्याचे आश्वासन संबंधितांना दिले आहे. त्यामुळे पैसे घेतल्याची तक्रार पोलिसांत देऊ नका, असे त्यांना बजावल्याचे संबंधित नागरिकांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे उद्या मंगळवारी सदर बेकायदा घरे पाडण्याच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कुणाच्या घरांवर हातोडा पडेल हे उद्याच्या कारवाईवेळी स्पष्ट होणार आहे. कारवाई थांबविण्यासाठी आमदार जोशुआ डिसोझा यांच्याकडे काहीजणांनी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाच्या आड आपण येऊ शकत नाही. सरकारची कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही बेकायदेशीर घरे बांधणारे संबंधित लोक आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.