‘लाला की बस्ती’वर बुलडोझर
बेकायदेशीर 25 घरे जमिनदोस्त : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
वार्ताहर/थिवी
थिवी पंचायत क्षेत्रातील कोमुनिदाद जागेत असलेल्या वादग्रस्त ‘लाला की बस्ती’ येथील 25 बेकायदा घरे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार काल मंगळवारी पाडण्यात आली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. थिवी अवचितवाडा येथील वादग्रस्त ‘लाला की बस्ती’तील बेकायदा बांधकामांविरोधात 2011 साली कोमुनिदादने तक्रार केली होती. गेल्या 12 वर्षांपासून सदर प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. अखेर गोवा खंडपीठाने सदर घरे बेकायदेशीर ठरवून पाडण्याचा आदेश दिला असून त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.
काल मंगळवारी झालेल्या कारवाईच्यावेळी बार्देश तालुक्याचे मामलेदार अनंत मळीक, संयुक्त मामलेदार साईश नाईक, थिवी कोमुनिदाद अॅटर्नी सावियो परेरा, उत्तर गोवा कोमुनिदादचे सचिव नरेश साळगावकर, लिपिक प्रसन्न परब, मोहन नार्वेकर, कोलवाळ पोलिस निरीक्षक विजय राणे, म्हपसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, अंजुणा पोलिस निरीक्षक सुरज गावस, डिचोली पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर, पर्वरी पोलिस निरिक्षक राहुल परब आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या आदशेनुसार सदर कारवाई झाली आहे. ही केवळ सुरुवात असून यापुढेही अशा बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू राहणार आहे, असे थिवी कोमुनिदादच्या अॅटर्नीने स्पष्ट केले.
या भागात राहणारा लाला बेपारी याने आपण सदर जमिनीचा टेनंट असून या घरांना बांधकामासाठी ना हरकत दखला दिलेला नाही. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही, असे सांगितले. ही घरे सुमारे 20 पेक्षा जास्त वर्षांपासूनची घरे आहेत. यासाठी तत्कालीन कोमुनिदाद व इतरांना आम्ही मोबदला दिला होता. काही राजकाराण्यांनी आमचा मतांसाठी वापर केल्याचा आरोप घरांवर कारवाई झालेल्या संबंधित लोकांनी यावेळी केला. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भागातील अन्य बेकायदा घरांचे बांधकाम केलेल्यांवरही भीतीचे सावट निर्माण झाले आहे.