करासवाड्यात 35 बेकायदा बांधकामांवर फिरवला बुलडोझर
म्हापसा पालिकेची दुसरी बुलडोझर कारवाई : आठ दिवसांपूर्वी सहा बांधकामे केली जमिनदोस्त
वार्ताहर/रेवोडा
करासवाडा-म्हापसा जंक्शनवर राष्ट्रीय महामार्ग 66 च्या दुतर्फा बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली आणि त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा ठरलेली 35 बांधकामे काल शुक्रवारी सकाळी म्हापसा नगरपालिकेने बुलडोझर फिरवून जमिनदोस्त केली. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असा आदेश जारी केला होता. बेकायदशीरपणे उभारण्यात आलेल्या 53 बांधकामांना पालिका प्रशासनाने नोटिस बजावली होती. त्यातील दोन बांधकामांना रितसर परवानगी होती. इतर 50 बांधकामे बेकायदेशीर होती. यातील चौदाजणांनी कोर्टात जाऊन स्थगिती आणली होती.
मात्र नंतर त्यांनी ती बेकायदा बांधकामे स्वत:हून मोडून टाकल्याने उर्वरित 35 बांधकामे काल शुक्रवारी कडक पोलिस बंदोबस्तात बुलडोझरने मोडून टाकण्यात आली. ही कारवाई म्हापसा नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, बार्देशच्या संयुक्त मामलेदार मेघना नाईक, उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर, पालिका अभियंता प्रशांत नार्वेकर, इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
म्हापसा नगरपालिकेने गेल्या आठ दिवसात ही दुसरी धडक बुलडोझर कारवाई केली. 11 ऑक्टोबर रोजी एकतानगर, गृहनिर्माण वसाहतीजवळ कुख्यात सिद्दीकी खान याने बेकायदेशीरपणे उभारलेल्या सहा बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती जमिनदोस्त करण्यात आली होती. त्यानंतर काल शुक्रवारी ही दुसरी कारवाई करुन करासवाडा येथील 35 बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या या बेकायदा बांधकामांत विविध व्यवसायही सुरू होते. त्यात चिकन, मटण विक्रेते, लाकुड व्यवसाय, हॉटेल, मोबाईल दुरूस्ती, केश कर्तनालय, आदी व्यावसाय मोठ्या प्रमाणात चालू होते. हे व्यवसाय रस्त्याजवळच असल्याने वाहतुकीला मोठा व्यत्यय येत होता.