बुलडोझर अॅक्शन सुरू, अँटी-रोमियो स्क्वाड तयार
बिहारमध्ये एकूण 400 माफिया, 1300 गुन्हेगारांची संपत्ती होणार जप्त
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारमध्ये संघटित गुन्हेगारीच्या विरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वात गुन्हेगारी आणि माफिका नेटवर्कचे उच्चाटन करण्यासाठी व्यापक स्तरावर कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात 400 कुख्यात गुन्हेगारांची संपत्ती जप्त केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात 1200-1300 आणखी गुन्हेगारांना सूचीबद्ध करण्यात आले आहे, ज्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सागितले आहे.
वाळू, भूमी माफिया, कॉन्ट्रॅक्ट किलर्स लक्ष्य
या यादीत वाळू माफिया, भूमीमाफिया, मद्यतस्कर, कॉन्ट्रॅक्ट किलर्स, संघटित टोळी आणि आर्थिक गुन्ह्यात सामील गुन्हेगारांची नावे सामील आहेत. कुठल्याही मोठ्या गुन्हेगाराची अवैध संपत्ती राज्य सरकार सहन करणार नसल्याचा निर्णय गृहमंत्र्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. याचमुळे पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओयू) संयुक्तपणे कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. सरकारी जमिनींवर अतिक्रमणाच्या विरोधातही मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राजधानी पाटण्यासमवेत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात बुलडोझर अॅक्शन दिसून येत आहे.
महिला सुरक्षेला प्राथमिकता
बिहारमध्ये महिलांची सुरक्षा सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या प्राथमिकतेला विचारात घेत राज्यभरात अँटी-रोमियो स्क्वाड नव्याने सक्रीय केले जात आहे. शाळा आणि महाविद्यालयांबाहेर महिला सुरक्षा दलाला विशेष तैनात केले जाणार आहे. राज्य सरकार याकरता 2000 नव्या स्कूटी खरेदी करत असून त्या महिला पोलिसांना पुरविण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
अँटी-रोमियो स्वाडची स्थापना
महिला पोलिसांची ही पथके शाळेच्या ठिकाणी आणि गर्दीयुक्त जागांवर सातत्याने गस्त घालणार आहेत. विद्यार्थिनींची छेडछाड, पाठलाग करणे किंवा कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तनावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हे पाऊल सुरक्षा वाढविण्यासह विद्यार्थिनी आणि महिलांदरम्यान विश्वासही वाढविणार आहे. राज्यात कुठल्याही संघटित गुन्हेगारी किंवा महिलाविरोधी गुन्हे सहन केले जाणार नाहीत. कायदा स्वत:चे काम करेल आणि गुन्हेगारांच्या अवैध कमाईवर सातत्याने प्रहार होत राहणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.
कारवाई होणार तीव्र
राज्य सरकारच्या या मोठ्या अॅक्शन प्लॅनला पोलीस विभागाने मिशन मोडमध्ये लागू करण्यास सुरूवात केली आहे. तसेच आगामी काळात मोठ्या माफियांवर अंकुश लावण्यासाठी अनेक कठोर पावले दिसून येऊ शकतात. राज्याचे गृहमंत्री सम्राट चौधरी यांनी बिहारमधील गुंडगिरी मोडून काढण्याचे संकेत दिले आहेत. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्याची तयारी नितीश कुमार सरकारने चालविली असल्याचे मानले जात आहे. यानुसार गुन्हेगारांच्या विरोधात बुलडोझर कारवाई करण्यावर भर दिला जाऊ शकतो. तसेच गुन्हेगारांच्या विरोधात चकमकी होऊ शकतात.