आरोंद्यात वीज वाहिनीच्या धक्क्याने बैल जागीच गतप्राण
शेतकऱ्यांचे ७० हजाराचे नुकसान ; भरपाई देण्याची ग्रामस्थांची महावितरणकडे मागणी
न्हावेली / वार्ताहर
वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्यामुळे आरोंदा येथे एक बैल जागीच गतप्राण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.यात संबंधित शेतकऱ्याचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान संबंधित शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढण्याची मागणी आरोंदा ग्रामस्यांकडून जोर धरू लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.वीज वाहिन्यांचा बैलाचा स्पर्श होऊन त्याला विजेचा धक्का बसला आणि जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.यापूर्वीही अशा घटना घडल्या असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.आरोंदा ग्रामस्थांनी शासनाकडे आणि महावितरणकडे मृत बैलाच्या मालकाला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या बदलणे आणि त्यांची नियमित देखभाल करणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.