तिसऱ्यांदा आण्विक केंद्र निर्माण करतोय इराण
इस्रायलच्या हल्ल्यामुळे झाले होते नुकसान
वृत्तसंस्था, तेहरान
इराणच्या पारचिन सैन्य परिसरात स्थित तालेगान-2 दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या नजरेत राहिले आहे. पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेनुसार हे ठिकाण इराणच्या जुन्या अमाड आण्विक कार्यक्रमाशी संबंधित होते. तेथे उच्च विस्फोटक परीक्षण करण्यात आल्याचे आरोप झाले होते. इराण नेहमीच हे आरोप फेटाळत असला तरीही या स्थळावरील भूमिगत कक्ष आणि संरचना तज्ञांसाठी संशयाचा विषय राहिल्या आहेत. ऑक्टोबर 2024 आणि मार्च 2026 मध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे तालेगान-2 स्थळाचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु इराण पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माणकार्य करत असल्याचे समोर आले आहे.
जून महिन्यात येथे दुरुस्तीचे कार्य सुरू झाले आहे. उपग्रहीय छायाचित्रांमधून इराण आता केवळ दुरुस्ती करत नसून अतिरिक्त सुरक्षा उपायही जोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विस्फोटापासून बचावासाठी विशेष सुरक्षा थर, काँक्रिटचे एप्रन आणि छिद्रांवर झाकण यासारख्या व्यवस्था सामील आहेत. इराण या स्थळाला दीर्घकाळापर्यंत चालू ठेवू इच्छितो आणि भविष्याच्या संभाव्य हल्ल्यांपासून वाचण्याची तयारी करत असल्याचे या पावलांमधून दिसून येते.
सुरक्षा उपायांना महत्त्व
जूनपासून सुरू झालेल्या दुरुस्ती कार्यात तेजी दिसून येत आहे. भूमिगत कक्षाचे नुकसानग्रस्त हिस्स्यांना झाकणे आणि मजबूत करण्याचे काम सुरू आहे. काँक्रिटचे थर आणि सुरक्षात्मक संरचना जोडल्या जात असून इराण या स्थळाला आणखी मजबूत करत असल्याचे स्पष्ट होते. इन्स्टीट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी यासारख्या संघटनांनी या पॅटर्नला मोठ्या चिंतेचा विषय ठरविले आहे. वारंवार विनाशानंतरही स्थळाला पुन्हा उभे करणे सामान्य सैन्य घडामोडींपेक्षा अधिक गंभीर संकेत देणारे असल्याचे म्हटले गेले आहे.
इराणचा दावा, पाश्चिमात्यांना संशय
वर्तमान काम कुठल्याही आण्विक संबंधित घडामोडींशी जोडलेले आहे की नाही हे उपग्रहीय छायाचित्रांमधून निश्चित केले जाऊ शकत नाही. केवळ संरचनात्मक बदलच दिसून येत आहेत. ही सामान्य संरक्षणात्मक दुरुस्ती आणि आमचे आण्विक प्रयत्न शांततापूर्ण उद्देशांसाठी आहेत असा दावा इराणने केला आहे. तर ही घटना इराणयच आण्विक कार्यक्रमावरून दीर्घकाळापासून सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा नवे बळ देत आहे. आयएईए सातत्याने इराणकडे अधिक पारदर्शकतेची मागणी करत आहे. भूतकाळात इराणकडून उच्च विस्फोटक परीक्षणांचा उद्देश अण्वस्त्रप्राप्त करण्याची क्षमता विकसित करण्याचा होता असे पाश्चिमात्य देश आणि इस्रायलचे मानणे आहे.