दर्जेदार रस्ते करा, अन्यथा कारवाई
कोल्हापूर :
रस्ते कामात गुणवत्ता आढळली नाही तर कारवाई करू, अशा इशाऱ्याची नोटीस महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभिंयता आणि कनिष्ट अभिंयत्याना बजावली आहे. शहरात सध्या सुरु असलेल्या रस्ते कामात दर्जेदार मेटरियल वापरले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्ते कामावर लक्ष ठेवावे, दर्जेदारच रस्ते होतील हे पहावे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
राज्यशासनाकडून नगरोत्थान योजनेतून मिळालेल्या 100 कोटीच्या निधीतील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याने हा विषय चर्चेच बनला आहे. महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी जागेवर जाऊन रस्ते कामाची पाहणी केली. यामध्ये रस्ते दर्जदार नसल्यो आढळल्याने त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ठेकेदारासह उपशहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, तत्कालिन उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह एका कनिष्ठ अभियंतावर कारवाई केल्यानंतर त्यांनी मोर्चा आता महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभिंयता, कनिष्ठ अभिंयता यांच्याकडे वळविला आहे. वास्तविक विभागीय कार्यालयांतर्गत हे रस्ते होत असताना त्यांचीही रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. परंतू त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्ते कामाचा दर्जा तपासणे, योग्य मटेरियल, मशिनरी वापरली जाणे यासाठी त्रयस्थ सल्लागार कंपनी नेमली असली तरी देखील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनीही या कामामध्ये हयगय केली आहे.
ठेकेदार कंपनीवर कोणतेही नियंत्रण ठेवलेले नाही. त्यामुळे सुमार दर्जाचे रस्ते होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित सर्वच अधिकाऱ्यांनही ठेकेदार कंपनीकडून सुरु केलेल्या कामावर लक्ष दिले पाहिजे. टेंडरमधील निकषाप्रमाणे दर्जेदार रस्ते आकाराला आले पाहिजेत. त्यादुष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे. तसे न केल्यास यासाठी संबधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस महापालिका प्रशासकांनी उपशहर अभियंता विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 4 तसेच सर्व कनिष्ट अभिंयत्याना दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
महापालिका प्रशासकांचा गेले काही दिवस रूद्रावतार पाहण्यास मिळत आहे. लेटकमर टिपर चालक, सफाई कर्मचारी यांच्यावर कारवाई केल्यानंतर शहर अभियंतासोबत आता उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांवरही त्यांची करडी नजर असणार आहे. शुक्रवारी दिलेल्या नोटीसमुळे त्यांच्यात खळबळ माजली आहे.