बदलत्या जगात तंत्रज्ञानाच्या जोरावर स्वावलंबी भारत घडवा
भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री अजयकुमार सूद यांचे प्रतिपादन : व्हीटीयूचा 25 वा वार्षिक दीक्षांत सोहळा उत्साहात
बेळगाव : सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये तंत्रज्ञान हे सर्वोत्तम मार्गदर्शक व साहाय्यक आहे. तंत्रज्ञान केवळ वैयक्तिक अथवा व्यावसायिक प्रगती घडवत नाही तर एक मजबूत आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याची महत्त्वाची शक्ती त्यामध्ये आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने राबवलेल्या नवोपक्रमामुळे रोजगार क्षमता वाढली असून शेती, आरोग्यसेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये उत्पादकता वाढली आहे. त्यामुळे तरुणांनी बदलत्या जगात तंत्रज्ञानाच्या जोरावर स्वावलंबी भारत घडवावा, असे प्रतिपादन भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री प्राध्यापक अजयकुमार सूद यांनी केले.
बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू)चा पंचविसावा वार्षिक दीक्षांत सोहळा शुक्रवारी ज्ञानसंगम कॅम्पस येथे पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याचे राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती थावरचंद गेहलोत उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था गरिबीतून महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. तंत्रज्ञानामुळे चंद्रयान, मंगळयान यासारखे अंतराळ प्रकल्प, यूपीआय सारख्या डिजिटल पेमेंटमध्ये झालेली क्रांती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. विकसित भारताचे स्वप्न आता साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर युवा पिढीला करावा लागणार आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताच्या तांत्रिक पराक्रमाचे प्रदर्शन आहे. स्वदेशी बनावटीचे तयार केलेले क्षेपणास्त्र, ड्रोन या आधारित प्रणालीमुळे भारत एक स्वावलंबी राष्ट्र म्हणून जगासमोर येत आहे.
पदवीदारांनी उद्योग निर्मिती करावी
राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले, सर एम विश्वेश्वरय्या हे नावच तरुणांना प्रेरणा देते. नाविन्य व सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी या तऊणांना तांत्रिक ज्ञानाचा नक्कीच वापर होईल. पदवीदारांनी उद्योग निर्मिती करून अधिकाधिक रोजगार निर्माण करावा. विकसित भारताच्या स्वप्नासह आपण आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि देशाला जागतिक शक्ती बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे विचार त्यांनी मांडले.
मानद डॉक्टरेट देऊन सन्मान
इस्रोचे अध्यक्ष व अंतराळ विभागाचे सचिव डॉक्टर व्ही. नारायणन, एक्सेल इंडियाचे संस्थापक पद्मश्री प्रशांत प्रकाश, बेंगळूर येथील एन्ट्रीया विद्यापीठाचे कुलगुरू सी. एस. सुंदर राजू यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या तिघांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात आले. यावषी 58 हजार 861 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी देण्यात आली. त्याचबरोबर 117 बी टेक 10 बी प्लॅन, 1040 बी आर्क, 24 बीएससी ऑनर्स तसेच 262 विद्यार्थ्यांनी पीएचडी संपादित केली. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रारंभी कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस. यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच त्यांनी व्हीटीयूच्या प्रगतीचा आढावा मांडला. मूल्यमापन विभागाचे रजिस्टर टी. एस. श्रीनिवासन यांनी दीक्षांत सोहळ्याचे नेतृत्व केले. रजिस्टर बी. इ. रंगास्वामी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. यावेळी प्रा. संजय एच. ए., फायनान्स ऑफिसर डॉ. प्रशांत नायक यासह इतर उपस्थित होते.