यल्लम्मा डोंगरावर समुदाय भवन उभारा
लैंगिक अल्पसंख्यांना फोरमची मागणी
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा डोंगरावर लैंगिक अल्पसंख्याकांसाठी समुदाय भवन उभारावे तसेच या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी लैंगिक अल्पसंख्याक फोरमतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. राज्यात 25 हून अधिक जिल्ह्यांमध्ये जोगप्पा जोगती यांचे वास्तव्य आहे. केवळ उत्तर कर्नाटकात 20 हजाराहून अधिक जोगती आहेत. हे सर्व सौंदत्ती येथील यल्लाम्मा देवीचे भक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेसह इतर वेळीही त्यांची ये-जा असते. परंतु मंदिर परिसरात भाविकांसाठी कोणत्याही सुविधा पुरविल्या नाहीत. जोगत्यांना एकतर खुल्या जागेवर अथवा झोपड्यांचा आधार घ्यावा लागतो. झोपण्यासाठी जागा नसल्याने अनेकवेळा छेडछाडीचे प्रकारही होतात. त्यामुळे मंदिर परिसरात दोन एकर जागा राखीव ठेऊन समुदाय भवन बांधण्याची मागणी निवेदनद्वारे केली. यावेळी फोरमच्या भारती कांबळे, किरण चिठ्ठी, दिक्षा सावंतसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.