शहरात पारंपरिक पद्धतीने म्हशींची मिरवणूक
म्हशी पळविण्याचा थरार : गवळी बांधवांचा उत्तम प्रतिसाद.
बेळगाव : दिवाळी पाडव्यानिमित्त शहरात शनिवारी म्हशींची वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. त्याबरोबरच गवळी बांधवांकडून म्हशी पळविण्याचा थरारही पाहावयास मिळाला. हलगीचा कडकडाट व दुचाकीच्या सायलेन्सरच्या आवाजावर म्हशी धावल्या. यामध्ये गवळी बांधवांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला. दुभत्या जनावरांचे महत्त्व पटवून देऊन पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पाडव्यानिमित्त म्हशींची मिरवणूक काढली जाते. म्हशींच्या शिंगांना रंग, रिबन, गोंडे, गळ्यात साखळ्या, घंटा, पायात गोंडे बांधून सजविले होते. सकाळी म्हशींचे पूजन करून त्यांना सर्वत्र फिरविण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या म्हशी आकर्षण ठरत होत्या. शहरातील गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, चव्हाट गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, भातकांडे गल्ली, नानावाडी, कोनवाळ गल्ली, वडगाव, पाटील गल्ली, रयत गल्ली, शहापूर आदी ठिकाणी म्हशींची मिरवणूक तसेच त्यांच्या पळविण्याचा थरार पाहावयास मिळाला. या मिरवणुकीमुळे गवळी बांधव आणि पशुपालकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामीण भागातही म्हशींची मिरवणूक
पाडव्यानिमित्त ग्रामीण भागातही म्हशींना सजवून मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याची परंपरा जपण्यात आली. उचगाव, बेनकनहळ्ळी, जाफरवाडी आदी गावांमध्ये म्हशींची मिरवणूक काढण्यात आली. म्हशींच्या शिंगांना रंग, रिबन, गळ्यात घंटा, पायात साखळ्या बांधण्यात आल्या होत्या. त्याबरोबरच दुचाकीच्या पाठीमागून म्हशी धावण्याचा थरारही अनुभवास मिळाला.
हिंडलगा येथेही जपली परंपरा
दीपावलीत पाडव्यादिवशी गवळी समाज व शेतकरी यांच्यावतीने म्हशींची भव्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदाही जपण्यात आली आहे. खास दीपावलीनिमित्त हिंडलगा येथील समस्त गवळी समाजाने आपल्या म्हशींच्या शिंगांना रंगीबेरंगी रिबन, गळ्यात कवडी माळा, मोर पिसे, पायात गोंडे बांधून सजविले होते. सजविलेल्या म्हशींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे उदघाटन ग्रा.पं. सदस्य रामचंद्र मनोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलताशा तसेच इतर वाद्ये होती. या मिरवणुकीचा प्रारंभ बाजीप्रभू देशपांडे चौकात करण्यात आला. तेथून नवीन वसाहत, हायस्कूल रोड, रामदेव गल्ली, मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, महादेव गल्ली, मांजरेकरनगर या ठिकाणी मोठ्या संख्येने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप बॉक्साईट रोड येथील कलमेश्वर मंदिर या ठिकाणी करण्यात आला. जवळ जवळ पाच तास ही मिरवणूक संपूर्ण गावभर फिरत होती. मिरवणुकीत फुलांची उधळण, गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात केली जात होती. गवळी समाज तसेच शेतकरी समाज यांनी एकत्रितरीत्या ही मिरवणूक उत्साहात पार पाडून आपल्या आनंदात भर टाकली. गावातील नागरिकांनीही या मिरवणुकीचा आनंद लुटला.