बुधाजी कासार यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार
रा. प. महामंडळाच्या मुंबईतील वर्धापन दिन सोहळ्यात पुरस्कार प्रदान
ओटवणे : प्रतिनिधी
सावंतवाडी एसटी आगाराचे चालक तथा वाहक बुधाजी लक्ष्मण कासार यांनी प्रवाशांची सुरक्षित सेवा हीच सर्वोच्च जबाबदारी पार पाडल्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट प्रवासी सेवेबद्दल त्यांना एसटी महामंडळाच्या मुंबई विभाग व्यवस्थापक चेतना खिरवाडकर यांच्याहस्ते लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई विद्याविहार येथे झालेल्या या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे मुंबई विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, ठाणे विभाग नियंत्रक श्री परचुरे, आदी उपस्थित होते.मुळचे माजगाव कासारवाडा येथील बुधाजी कासार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत कार्यरत असतांना आपल्या उत्कृष्ट कार्यतत्परतेने, प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने व प्रवासी सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची लालपरी गौरवरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली दक्षता, महामंडळाच्या प्रतिमेत केलेली भर, प्रामाणिक सेवा, उत्कृष्ट उत्पन्नवाढ, प्रसंगावधान राखून केलेले कार्य व समाजभिमूख सेवेतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.बुधाजी कासार यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.