अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा
सातारा :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढवणारा असून त्यांची क्रयशक्ती वाढल्याने देशातील विकास झपाट्याने होण्यास हातभार लागणारा हा अर्थसंकल्प आहे. विकासित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेण्याचे काम करतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केला. नागरिकांची बचत वाढून नागरिकच देशविकासाचे भागीदार कसे बनतील, त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
साताऱ्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, राहुल शिवनामे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.
माधव भंडारी म्हणाले, शेतकरी, गरीब, महिला व युवा या विकसित भारताच्या चार प्रमुख स्तंभांना सक्षम करण्याचे काम अर्थसंकल्पाने केले आहे. सामाजिक क्षेत्र, लहान मुले आणि युवा शिक्षण, पोषण यासह आरोग्यापासून ते स्टार्ट अप्स आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्रातील तरतुदींमध्ये लक्षणीय भर टाकल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येते. अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ आणि रोजगाराच्या वृद्धीसाठी सुक्ष्म, लघू उद्योग, मुलभूत सुविधा आणि नवोन्मेषासाठी गुंतवणूक क्षेत्र आणि जागतिक स्तरावर आर्थिक विकासासाठी निर्यात क्षेत्र या आर्थिक वाढीच्या प्रमुख चार चाकांवर लक्ष केंद्रीत करुन त्या दिशेने अर्थसंकल्पात तरतूदी केल्याचे त्यांनी सांगितले.