अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन आठवड्यांचे
राज्य सरकारकडून अधिकृत आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त निश्चिम केला असून तीन आठवडे हे अधिवेशन बेंगळूरमध्ये चालणार आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन 3 मार्चपासून सुरु होणार असून त्या दिवशी सकाळी 11 वाजता कामकाजाला प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी राज्यपाल थावरचंद गेहलोत दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. मंगळवार 4 मार्च ते गुरुवार 6 मार्चपर्यंत राज्यपालांच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 7 मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अर्थमंत्री या नात्याने 2025-26 या सालातील राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. 21 मार्चपर्यंत अधिवेशन चालणार असून 10 मार्चपासून अर्थसंकल्पावर चर्चा होईल. अधिवेशनाच्या अखेरीस सरकार अर्थसंकल्पावर उत्तर देणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याबाबत व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
मागील तीन आठवड्यांपासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विविध खात्यांशी अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत मागण्या आणि तरतुदींविषयी चर्चा सुरू केली आहे. सोमवारी त्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या मागण्या आणि सल्ले जाणून घेतले. फेब्रुवारी अखेरीस अर्थसंकल्पाला अंतिम स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे.