विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
पणजी : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवार दि. 24 मार्चपासून सुरू होत असून ते तीन दिवस चालणार आहे. 26 मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11.30 वा. अधिवेशन चालू होणार असून सकाळच्या सत्रात प्रश्नोत्तर व शून्य तास तर दुपारच्या सत्रात सायंकाळपर्यंत इतर कामकाज चालणार आहे. मडगावातील बलात्कार व गोवा विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरण, श्रीखाप्रेश्वर मंदिर हटवण्याचा प्रकार इत्यादी काही विषय विरोधी आमदार उपस्थित करणार आहेत.
निधन झालेल्या अनेक मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. काहीजणांचे अभिनंदनही होणार आहे. विविध प्रकारचे अहवाल सादर केले जाणार असून पहिले दोन दिवस दुपारच्या सत्रात सायंकाळपर्यंत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी डॉ. सावंत हे अर्थसंकल्प सादर करतील. सोमवारी इतर कामकाजासोबतच काही दुरुस्ती विधेयके मांडून ती संमत करण्यात येणार आहेत. गोवा राज्य संशोधन फाऊंडेशन दुरुस्ती विधेयक, खासगी विद्यापीठ दुरुस्ती विधेयक, रोजगार विनिमय दुरुस्ती विधेयक 2025 अशी विधेयके सादर होणार आहेत. या अधिवेशनात शुक्रवार नसल्याने खासगी ठराव चर्चेला येणार नाहीत. अधिवेशन कमी दिवसांचे असल्याने विरोधी आमदारांत नाराजी व चीड असून त्याबाबत ते आवाज उठवण्याची चिन्हे दिसत आहेत.