पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प हा ‘अजेंडा’ अमान्य
विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्र्यांच्या मते अधिवेशनाचा पहिला दिवस अर्थात शुक्रवार दि. 6 मार्च हा एक शुभ दिवस आहे. त्यामुळे त्याच दिवशी ते अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सांगितले.
खरे तर अर्थसंकल्पावर दरवेळी तीन दिवस चर्चा होते, परंतु यावेळी केवळ दोनच दिवस ती होणार असल्याने आमदारांना कमी वेळ मिळणार आहे. तसेच अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात येणार असल्याने खासगी कामकाजाचा एक दिवस कमी होणार आहे. म्हणूनच अर्थसंकल्प अन्य एखाद्या दिवशी मांडण्याची सूचना आपण केली होती, असे सरदेसाई यांनी सांगितले.
प्रत्यक्षात शुक्रवार हा ‘खाजगी सदस्य दिवस’ असतो. त्यामुळे त्याच दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. सरकारचा अजेंडा पुढे नेण्याचा हा डाव आहे, असा आरोपही करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील 32 खात्यांच्या मागण्या एकाच दिवसात हाती घेतल्या जाणार असल्याने ती कृतीही अन्यायकारक असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.