बुद्धांच्या अष्टांग मार्गाचा अवलंब व्हायला हवा
प्रा. साहुकार कांबळे यांचे प्रतिपादन : गौतम बुद्ध विहारात जयंती साजरी
बेळगाव : द्वेषावर द्वेषाने विजय मिळविणे शक्य नाही. प्रेम, आदरभावाने विजय मिळविणे शक्य आहे, असा संदेश भगवान गौतम बुद्धांचा होता. लोभ हे दु:खाचे कारण आहे. जगातील दु:खे दूर करण्यासाठी बुद्धांनी अष्टांग मार्ग दाखवून दिला. बुद्धांच्या शिकवणीचा जीवनात अवलंब केल्यास जीवन सुखी होणे शक्य असल्याचे प्रतिपादन प्रा. साहुकार कांबळे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड-संस्कृतिक विभाग, तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सदाशिवनगरातील बुद्ध विहारमध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रा. कांबळे यांचे व्याख्यान झाले.
बुद्ध धर्माचा अवलंब केला पाहिजे, बुद्धांच्या शिकवणीतून जीवन यशस्वी व उच्चस्तरावर पोहचते. बुद्धांच्या अष्टांग योगाचा अवलंब प्रत्येकाकडून झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध व त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला होता, असे कांबळे यांनी सांगितले. भगवान बुद्धांना एकाने विचारले होते की, ध्यानातून तुम्ही काय मिळविले? यावर काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, स्वार्थ हे अवगुण ध्यानाद्वारे आपण दूर केल्याचे बुद्ध म्हणाले होते, असेही कांबळे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कन्नड-सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, जिल्हा पंचायतीचे साहाय्यक सचिव राहुल कांबळे, नेते मल्लेश चौगले, वाय. बी. गडीनायक, बसवराज रायव्वगोळ, यल्लाप्पा कांबळे, सिद्राय मेत्री, कल्लाप्पा कांबळे, सुनंदा वाघमोरे आदी यावेळी उपस्थित होते.