For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या वैमनस्यातून बसप प्रदेशाध्यक्षाची हत्या

06:27 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुन्या वैमनस्यातून बसप प्रदेशाध्यक्षाची हत्या
Advertisement

पोलिसांकडून दावा : गँगस्टरच्या भावाचा हात

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडू बसपचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचे प्रकरण आता राजकीय रंग धारण करू लागले आहे. चेन्नई पोलीस या हत्येप्रकरणी तपास करत आहेत.  गँगस्टर अर्कोट सुरेशच्या सहकाऱ्यांचा या हत्येमागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अर्कोट सुरेशची मागील वर्षी ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती.

Advertisement

प्रत्येक संशयिताची कसून चौकशी केल्यावर आतापर्यंत आम्ही 8 आरोपींना अटक केली आहे. आम्ही रक्ताने माखलेले अस्त्र, एक टीशर्ट आणि बॅग तसेच तीन बाइक्स जप्त केल्या आहेत. या सर्व साहित्याचा वापर हत्येसाठी करण्यात आला होता असा दावा उत्तर चेन्नईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असरा गर्ग यांनी केला आहे.

चेन्नई पोलिसांकडुन स्थापन विशेष पथकांनी आणखी तीन संशयितांची ओळख पटविली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये अर्कोट सुरेशची हत्या करण्यात आली होती.  अर्कोटचा परिवार आणि सहकाऱ्यांना हत्येच्या कटामागे आर्मस्ट्राँग यांचा हात असल्याचा संशय होता.

आर्मस्ट्राँग यांची हत्या अर्कोट सुरेशच्या सहकाऱ्यांनी केली असून यात त्याचा भाऊ देखील सामील होता, या आरोपींना आम्ही अटक केली असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असरा गर्ग यांनी सांगितले आहे. दुचाकी वाहनावरून आलेल्या काही जणांनी बसप नेत्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बसप नेत्याचे पार्थिव शरीर श्रद्धांजलीसाठी चेन्नईच्या एका शाळेतील मैदानात ठेवण्यात आले होते.

मायावतींकडून कारवाईची मागणी

बसप अध्यक्ष मायावती यांनी चेन्नईत धाव घेत आर्मस्ट्रॉग यांच्या कुटुंबीयांची भेट  घेतली आहे. तसेच दिवंगत आर्मस्ट्राँग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे. मायावती यांनी या हत्येप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तामिळनाडू सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष देणे गरजे आहे. तसेच दुर्बल वर्गाच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी मायावती यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.