बीएसएनएलचा महसूल वधारला
वाढीसह 4,418 कोटींच्या घरात : तिमाही कामगिरीची आकडेवारी सादर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतातील चौथी सर्वात मोठी दूरसंचार सेवा देणारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने जून 2026 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी, मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत महसुलात 10 टक्के वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल (तात्पुरत्या आधारावर) 4,418 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,017 कोटी होता.
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी एका आढावा बैठकीनंतर कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ते म्हणाले की, या सरकारी मालकीच्या कंपनीच्या एंटरप्राइज बिझनेस सेगमेंट आणि कंझ्युमर मोबिलिटीमध्ये वाढ झाली आहे, तर कंझ्युमर फिक्स्ड अॅक्सेस सेगमेंटमध्ये कोणताही लक्षणीय बदल झालेला नाही.
सिंधिया म्हणाले, ‘आमच्या एकूण महसुलाचा विचार केल्यास, थेट व्यावसायिक कामकाजातून मिळणारा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 10 टक्क्यांनी वाढला आहे.’ गेल्या काही वर्षांत बीएसएनएलच्या परिचालन नफ्यात सातत्याने सुधारणा झाली आहे.’
अडीच वर्षांपूर्वी सुमारे 2,100 कोटी रुपयांवरून हा नफा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5,100 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7,500 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचा परिचालन नफा जाहीर करण्यात आला नाही. ते असेही म्हणाले की, जून 2026 मध्ये संपणाऱ्या तिमाहीसाठी बीएसएनएलचा प्रति ग्राहक महसूल म्हणजेच एआरपीयू वाढून प्रति महिना 102.7 रुपये झाला आहे.