बीएसएनएलची पुढील वर्षी 5 जी सेवा
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची माहिती
नवी दिल्ली :
बीएसएनएलचे आपण ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक नवीन सुविधा कंपनीकडून उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत सरकार लवकरच घोषणा करणार आहे.
दूरसंचार सेवा अधिक चांगली देण्यासाठी प्रयत्न राहणार असून सरकारी मालकीच्या बीएसएनएलची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचेही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. पुढील वर्षाच्या मध्यावर 5जी सेवा बीएसएनएल लॉन्च कर करू शकते.
बीएसएनएलची स्थिती सुधारतेय
सिंधीया यांनी सांगितलं की बीएसएनएल आता स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी पूर्णपणे सक्षम होत असून गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये आपल्या महसुलामध्ये 12 टक्क्यांपर्यंत वृद्धी प्राप्त केली आहे. आज हा महसूल 21000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. खर्चामध्ये देखील जवळपास 2 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
1 लाख टॉवर्स उभारणार
कॉल कनेक्टिव्हिटी सेवेसंदर्भातली प्रगती देखील लवकरच प्रगतीपथावर असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बीएसएनएल पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत 1 लाख पेक्षा अधिक टॉवर्स उभारण्याची योजना बनवत आहे. सरकारी मालकीची सी डॉट आणि टाटाच्या मालकीची तेजस या दोन कंपन्यांच्या माध्यमातून बीएसएनएल स्वत:ची 4जी सेवा देत आहे.