माजगाव परिसरात बीएसएनएल सेवा विस्कळीत
सेवा सुरळीत न केल्यास ग्राहक सोमवारी घालणार अधिकाऱ्यांना घेराव
ओटवणे प्रतिनिधी
माजगाव परिसरात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएल मोबाईलच्या विस्कळीत सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले असुन माजगाव परिसरात बीएसएनएल मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन सेवा सुरळीत करावी अशी मागणी माजगाव परिसरातून होत आहे.मोबाईल सेवेच्या विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिसरात मोबाईल टॉवर आहे. मात्र बीएसएनएलच्या अनागोंदी कारभारामुळे गावात आधुनिक सेवा उपलब्ध असूनही त्या मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासनाच्या संगणकीय प्रणालीच्या सक्तीमुळे ऑफलाईन सेवा देता येत नाही. त्यामुळे गावातील संबंधित अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. पर्यायाने संबंधितांना ग्राहकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत बीएसएनएलचे अनेक वेळा लक्ष वेधले परंतु दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे सातत्याने बीएसएनएल मोबाईल विस्कळीत सेवेला ग्राहकांना सामोरे जावे लागते. दरम्यान रविवारपर्यंत टॉवरची विस्कळीत सेवा सुरळीत न केल्यास बीएसएनएलच्या सावंतवाडीतील अधिकाऱ्यांना घेरावा घालण्याचा इशारा माजगाववासियांनी दिला आहे.