चौके परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प
तत्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करा : माजी सरपंच राजा गावडे यांची मागणी
मालवण | प्रतिनिधी : चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या लगतच्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी लक्षवेधी मागणी चौके गावचे माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांनी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा अधिक दर्जेदार व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे प्रयत्नशील आहेत. अनेक टॉवर त्यांनी मंजूर करून घेतले. जनतेला दर्जेदार सेवा मिळावी यासाठी खासदार नारायण राणे साहेब सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे असताना संबंधित प्रशासनानेही गतिमान होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील सेवा काही समस्यांमुळे ठप्प होत असेल तर त्याबाबत त्वरित उपाययोजना गरजेच्या आहेत. चौके परिसरातील बीएसएनएल सेवा त्वरित सुरु करावी. अन्यथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे राजा गावडे यांनी बीएसएनएल मालवण तालुका प्रशासनाला सूचित करताना सांगितले.