हरिपुरात वेटरचा निर्घृण खून
सांगली :
हरिपूर येथील मुख्य रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास तरूणावर धारधार शस्त्राने तब्बल 24 वार करत निर्घृण खून करण्यात आला. सूरज अलिसाब सिदनाथ (वय 32 रा. पवार प्लॉट) असे या वेटरचे नाव आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार बारा तासात सात संशयितांना ताब्यात घेतले. गाडी आडवी मारल्याच्या शुलक कारणातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. यातील काही संशयित अल्पवयीन असल्याने रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, मृत सूरज सिदनाथ हा आपल्या कुटांबीयांसह शहरातील पवार प्लॉट परिसरात राहतो. सुरज हा सकाळी अंकली येथील वीटभट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणाऱ्या हॉटेल संगम येथे वेटरचे काम करायचा. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सूरज हा नेहमी प्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता. मध्यरात्री पाऊणे बारा ते सव्वा बाराच्या सुमारास सुरज हा त्याची दुचाकी (एमएच 10 एएन 2232) वरून घराकडे येत होता.
त्यावेळी काही संशयित त्याच रस्त्यावरून हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते. त्यावेळी सूरज आणि संशयित यांच्या गाडी अडवी मारल्याच्या शुलक कारणातून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी सुरज यास हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ गाठले. त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात स्वत:ला बचावण्यासाठी सुरज हा हरिपूरच्या दिशेने पळू लागला. काही अंतरावर असणाऱ्या एका घराच्या गेटसमोर तो कोसळला. त्याठिकाणीही हलेखोरांनी वार केले. वार वर्मी असल्याने अतिरक्तस्त्रावाने सुरजचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सूरज याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही धावले. मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणी पाठवण्यात आला. सूरज याच्यावर 24 वार झाले आहेत. पा†लसांनी मिळालेल्या माहितीनुसार तातडीने सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुनाची कबुलीही दिल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेटरचा दुसरा खून
आठवड्यात सलग दुसऱ्यांदा हॉटेल वेटरच्या खुनाची घटना झाल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. दोन्ही खूनाच्या घटना किरकोळ वादातूनच झाल्या.
खुनातील संशयितांना ग्रामीण पोलिसांसह संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चार मुल अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी एका मुलावर यापुर्वी खुनी हल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे.