Kolhapur Crime | तवंदीत साखर कारखाना कामगाराचा निर्घृण खून
Kolhapur Crime : तबंदी येथील डोंगरात हळ्ळीहिटणी (ता. गडहिंग्लज) येथील हरळी साखर कारखान्यातील कामगाराचा तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. २६ रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास उघडकीस आली. महंमद समशेर खलिफ (वय ५२, रा. हळळी हिटणी, ता. गडहिंग्लज) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तबंदी येथील सरकारी आडाजवळ सुमारे ५०० फूट आतल्या बाजूला इसम मृत झाल्याचे काही नागरिकांनी बघितले. या घटनेची माहिती त्वरित निपाणी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु घटनास्थळी भेट देताच हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी निपाणीचे सीपीआय बी. एस. तळवार, चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, प्रमुख के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह मोहम्मद खलिफ याचा असल्याचे निष्पन्न झाले. नंतर या घटनेची माहिती त्वरित त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटणारा होता. घटनास्थळी ठस्से तज्ज्ञ व श्वानपतकाला पाचरणकरण्यात आले होते. घटनेचा पुढील तपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजद्वारे करण्यात येत आहे. सदर खुनाचा शोध घेण्यासाठी पुणे, सातारा याठिकाणी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत. खुनाचा उलघडा लवकर होईल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. मृत इसम मोहम्मद हा हरळी साखर कारखान्यात शिपाई म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.