For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरसी येथे आयुर्वेदिक डॉक्टरचा भीषण खून

12:19 PM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिरसी येथे आयुर्वेदिक डॉक्टरचा भीषण खून
Advertisement

12 तासातच मारेकरी ताब्यात : डॉक्टराच्या घरातून लुटलेली रोख रक्कम-सोन्याचे दागिने जप्त

Advertisement

कारवार : लग्नाच्या अगोदर एक दिवस आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या नवरदेवाचा भीषण खून करण्यात आल्याची घटना शिरसी येथील के.एच.बी. कॉलनीच्या नवव्या क्रॉसवर घडली आहे. खून झालेल्या डॉक्टराचे नाव रमेश फकीरप्पा कलगुटकर (वय 52) असे आहे. या घटनेने शिरसी नगरात खळबळ माजली आहे. समाधानाची बाब म्हणजे खून झालेल्या 12 तासातच मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात शिरसी पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मारेकऱ्याचे नाव मंजुनाथ नाईक (रा. यल्लापूर) असे आहे. त्याच्याकडून डॉक्टराच्या घरातून लुटलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, शिरसी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील के.एच.बी. कॉलनीतील नवव्या क्रॉसवरील घरात रमेश फकीरप्पा कलगुटकर (वय 52) हे आयुर्वेदिक डॉक्टर वास्तव्य करून होते. त्यांच्या पत्नीचे पाच महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने आणि दोन मुलांपैकी एकटा बेंगळूरमध्ये आणि दुसरा वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असल्याने घरी डॉक्टर एकटेच राहत होते. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने रविवार दि. 19 रोजी डॉक्टर कलगुटकर आपल्या नातलगातील मुलीशी शिरसी तालुक्यातील मंजुगुणी येथे विवाहबद्ध होणार होते.

Advertisement

तथापि विवाहाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवार दि. 18 रोजी अज्ञात व्यक्तीने डॉक्टरांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. मारेकऱ्याने त्यानंतर डॉक्टरांच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर मारेकऱ्याने डॉक्टरांच्या घराला बाहेरुन कुलुप लावले आणि निघून गेला.  शनिवारी रात्री डॉक्टर घरी एकटेच असल्याने त्यांच्या खुनाची माहिती कुणालाच कळाली नाही. सोमवारी सकाळी लग्नाच्या गडबडीत असलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांना दुसऱ्या बाजूने प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी डॉक्टरांचे भाऊ इराप्पा कलगुटकर यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.

जिल्हा पोलीस प्रमुखांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच कारवार जिल्हा पोलीस प्रमुख दीपन एम.एन., शिरसीच्या डीवायएसपी गीता पाटील, सीपीआय शशिकांत वर्मा, पीएसआय बसवराज कनशेट्टी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. डॉक्टरांच्या नेहमीच सोबत राहणारा मंजुनाथ नाईक घटनेनंतर बेपत्ता झाल्याने स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली आणि नाईक याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता सत्य बाहेर पडले. नाईककडून डॉक्टरांच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले. जीवनात दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढायला काही तास शिल्लक असताना डॉक्टराचा खून झाल्याने हळहळ व्यकत करण्यात येत आहे. शिरसी मार्केट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.