Ratnagiri News: ब्राउन शुगर टर्की प्रकरणात दीड लाखाचा ऐवज जप्त, पोलीसांची धडक कारवाई
संशयित दुचाकीस्वाराकडून 44 हजाराचा ब्राउन शुगर टर्की जप्त केला
रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील माळनाका ते एसटी कॉलनी दरम्यानच्या मार्गावर गस्त घालत असताना एका संशयित दुचाकीस्वाराकडून 44 हजाराचा ब्राउन शुगर टर्की जप्त केला. या कारवाईत दुचाकीस्वार तरुणाला ताब्यात घेऊन एकूण एक लाख 44 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसानी ताब्यात घेतलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव अद्वैत संदेश चवंडे ( 23 रा. साळवीस्टॉप, रत्नागिरी) असे आहे. त्याच्याकडे 8 ग्रॅम वजनाच्या एकूण 88 पुड्या सापडल्या.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अमली पदार्थ विरोधात कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहरातील माळनाका ते एसटी कॉलनी जाणाऱ्या रस्त्यावरून गस्त घालत असताना एका दुचाकीस्वार तरुणाचा संशय आला.
पोलीस पथकाने त्याच्याकडील पिशवीची झडती घेऊन दोन पंचांसमक्ष चौकशी केली. पोलीस उपनिरीक्षक शेषराव शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, अजित कदम, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.