शिक्षण विस्तारासाठी भाईंनी आपले आयुष्य वेचले
गुहागर :
भाईंची तीनही मुले येथे शिकली की नाही ते मला माहित नाही, मात्र ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात भालचंद्र चव्हाण ऊर्फ भाई यांनी जे आयुष्य वेचले त्याला तोड नाही. चिपळूण येथील बांदल हायस्कूल वाचवण्यासाठी भाईंनी मला आग्रह केला होता. त्यानुसार मी ते प्रयत्न केले होते, अशा आठवणींना उजाळा आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात दिला. कै. भालचंद्र चव्हाण यांच्या आठवणी लाभलेले कार्य व योगदान या बाबत 'तरुण भारत संवाद'च्या विशेष पुरवणीचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.
तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भालचंद्र (भाई) रघुनाथ चव्हाण यांचे नुकतेच निघन झाल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या परिवारातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शोकसभा संपन्न झाली. यावेळी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांनी भालचंद्र चव्हाण यांच्या शैक्षणिक कार्यासह सामाजिक कार्याचा आढावा घेऊन माझे अधिक जवळचे संबंध असल्याचे अधोरेखित केले. भाईंनी मॅरेथॉन स्पर्धेसह इतर सर्व स्पर्धा विविध उपक्रम आपल्या संस्थेमार्फत आयोजित केले होते व त्यांच्या कार्यक्रमाला मला सातत्याने बोलावले जायचे. असे आमचे अधिक जिव्हाळ्याचे संबंध होते, असे ते म्हणाले.