फसवणूक प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक
पुतण्यालाही घेतले ताब्यात : बेंगळूर पोलिसांची कोल्हापूर, पुण्यात कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट देतो असे सांगून 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे ज्येष्ठ बंधू गोपाल जोशी आणि पुतणे अजय जोशी यांना अटक करण्यात आली आहे. बेंगळूरच्या बसवेश्वनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना हुबळीतील त्यांच्या निवासस्थाने नेऊन चौकशी केली. तसेच घरातील कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते.
निजदचे माजी आमदार देवानंद चौहान यांच्या पत्नी सुनीता चौहान यांनी गुरुवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर बेंगळूरच्या बसवेश्वरनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. अजय जोशी यांनी आमच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन लोकसभा निवडणुकीत तिकीट न देता फसवणूक केली आहे, अशी तक्रार सुनीता चौहान यांनी केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपाल जोशी बेपत्ता झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा माग काढत गोपाल जोशी यांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. तर त्यांचा मुलगा अजय जोशी यांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांचा आकड चारवर पोहोचला आहे. यापूर्वी सोमशेखर नायक आणि विजयलक्ष्मी यांना अटक झाली आहे.
शनिवारी दुपारी बेंगळूरहून हुबळीला आलेले एसीपी चंदनकुमार यांच्या नेतृत्त्वाखालीला पोलिसांच्या पथकाने हुबळीच्या केशवापूर येथील इंदिरा कॉलनीतील गोपाल जोशी यांच्या घराची झडती घेतली. त्यानंतर त्यांना अधिक चौकशीसाठी केशवापूर पोलीस स्थानकात आणले. तत्पूर्वी शनिवारी पहाटे 5:30 वाजता कोल्हापूर येथील एका लॉजमधून गोपाल जोशी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हुबळीत आणण्यात आणल्याचे समजते. या प्रकरणातील तक्रारदार सुनीता चौहान या देखील हुबळीतील केशवापूर पोलीस स्थानकात दाखल झाल्या. त्यांच्याकडूनही पोलिसांनी माहिती घेतली.
प्रकरणात प्रल्हाद जोशींचा सहभाग नाही : सुनीता चौहान
भाजपचे तिकीट देण्याचे सांगून पैसे घेऊन फसवणूक केलेल्या प्रकरणात केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांचा सहभाग नसल्याचे तक्रारदार सुनीता चौहान यांनी म्हटले आहे. शनिवारी हुबळीत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गोपाल जोशी यांनी प्रल्हाद जोशी यांच्या नावाचा दुरुपयोग केला आहे. मला चौकशीला हजर राहण्याची सूचना केशवापूर पोलिसांनी केली होती. त्यामुळे आपण हुबळीत आल्याचे सुनीता चौहान यांनी सांगितले.