गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ गजाआड
अमेरिका-कॅलिफोर्नियामध्ये कारवाई : बाबा सिद्दीकी हत्येसह सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी धोगेदोरे
वृत्तसंस्था/ .पॅलिफोर्निया
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अमेरिकेत पकडला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोलला पॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अनमोल बिश्नोई तपास यंत्रणांना हवा आहे. चित्रपट अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणीही तो वॉन्टेड आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स गँगमध्ये ‘भानू’ म्हणून ओळखला जातो. पंजाबमधील अबोहर येथे 2012 मध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला, बॅटरी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनमोल बिश्नोईवर बनावट पासपोर्ट वापरून परदेशात पळून गेल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनमोल बिश्नोई विरोधात दोन गुन्हे दाखल केले असून इतर 18 खटलेही सुरू आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येतही अनमोल बिश्नोईचे नाव असल्याचा आरोप आहे.
‘मोस्ट वॉन्टेड’च्या यादीत नाव
अनमोल बिश्नोई अमेरिकेत असल्याने भारताला याबाबत सतर्क करण्यात आले होते. भारतासोबत शेअर केलेल्या माहितीमध्ये अमेरिकेने त्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवताच त्याला जेरबंद केल्याची माहिती उघडकीस आली. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत त्याचे नाव आहे. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.
अनमोल बिश्नोईने सिद्दीकी यांच्या हत्येसह सलमान खानच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. एनआयएने 2022 मध्ये दाखल झालेल्या दोन गुह्यांमध्ये अनमोल बिश्नोईविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मोक्का न्यायालयात याचिका दाखल करत फरारी गुन्हेगार अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते.