Sangli Crime | मेव्हण्याने केला स्वतःच्या भाऊजीचा पैशासाठी खून; तर अपघाताचा बनाव ठरला खून
सांगली -सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा कवठेमहांकाळ पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणामागे तब्बल ३० लाखांच्या विमा रकमेसाठी रचलेला खुनाचा कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१९ मे रोजी विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे हे मृतावस्थेत आढळून आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळावरील पुराव्यांमधून हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान मयताच्या नावाने ३० लाखांचा अपघाती विमा काढण्यात आल्याची माहिती समोर आली. ही रक्कम आपल्या बहिणीला मिळावी यासाठी मेहुणा रामचंद्र धनप्पा खिलारे याने तुकाराम मारुती सांगोलकर याला ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. दोघांनी संगनमताने दत्तात्रय चावरे यांची हत्या करून अपघाताचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.