Ratnagiri Crime News: सीमकार्ड दिले नाही म्हणून भावानेच घातला डोक्यात लोखंडी रॉड
11:59 AM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
देवरुख : सीमकार्ड दिले नाही या क्षुल्लक कारणावरून भावानेच चुलत भावाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे गुरूवारी दुपारी घडली. या मारहाणीत सिध्देश मधुकर केळसकर हा जखमी झाला आहे. या प्रकरणाची फिर्याद सिध्देश केळसकर (३५, रा. कोंडगाव कातळवाडी) याने दिली आहे.
प्रितम उर्फ पिंट्या प्रकाश केळसकर (४१, रा. कोंडगाव कातळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्देश व प्रितम हे नात्याने चुलत भाऊ असून एकाच घरात राहतात. प्रितम याला दारूचे व्यसन असून सिध्देशच्या आई वडिलांना शिवीगाळ करत असतो. २८ रोजी दुपारी २.३० वा. सिध्देश शेजारील मित्र कौस्तुभकेतकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आला. कोंडगाव येथे चहाच्या टपरीवर असताना प्रितम याने सिध्देशकडे सीमकार्ड मागितले.
यावर सिध्देश याने प्रितम याला तु सीमकार्ड दिले नाहीस तर मी कुठून देवू असे सांगितले. तुला दुसरे सीमकार्ड हवे असेल तर मी देतो, असे सांगितले. या घटनेचा राग मनात धरून प्रितम याने लोखंडी रॉड सिध्देशच्या डोक्यात घातला. शिवीगाळ करून तुझ्या आईवडिलांना व खांनदानाला संपवून टाकतो, अशी धमकी दिल्याचे सिध्देश केळसकर याने फीर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेत सिध्देश केळसकर हा जखमी झाला आहे. मारहाणीसंदर्भात सिध्देश याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रितम याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Advertisement
Advertisement