शेती पाण्यासाठी खून करणाऱ्या बंधू व पुतण्यास जन्मठेप
वडूज :
शेताला पाणी पाजण्याच्या कारणावरून अण्णा धुळा वाघमोडे यांचा खून करणाऱ्या मारुती वाघमोडे या बंधूस व आबासो वाघमोडे या पुतण्यास वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, वरकुटे मलवडी येथील अण्णा धुळा वाघमोडे (वय: 70) वर्षे हे ज्वारीचे पिकाला पाणी पाजण्याकरिता गेले होते. शेतातील मोटारीची लाईट रात्री 02:00 वाजता येणार असल्याने ते ज्वारीचे शेतातच झोपले असताना त्यांचे सख्खे बंधू मारूती धुळा वाघमोडे व पुतण्या आबासो मारुती वाघमोडे यांनी तेथे जाऊन झोपेतून उठवून आम्हाला शेतातून पाणी नेऊन दे असे विचारले असता फिर्यादीचे वडील यांनी त्यास नकार दिल्याचा राग धरून दोघांनी संगनमताने त्यांच्या कडील असलेले कुऱ्हाड, दगड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला अशी खबर मयताचे मुलाने पोलीस ठाण्याला दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुह्यात बाजीराव ढेकळे सपोनि म्हसवड यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित प्रताप कदम (साबळे) यांनी पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 14 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपींना दोषी ठरवून आरोपी मारुती वाघमोडे व त्यांचा मुलगा आबासो वाघमोडे दोन्ही रा. वाघमोडे वस्ती वरकुटे मलवडी ता.माण या दोघांना प्रत्येकी जन्मठेप व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
याकामी सरकारी वकील सदर खटला चालवणे कामी अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सखाराम बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पो. उप. नि. दत्तात्रय जाधव, म. पो. हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. अमीर शिकलगार, पो. कॉ. जयवंत शिंदे, म.पो.कॉ. दया खाडे यांनी सहकार्य केले.