रोनक दाहियाला कांस्यपदक
दोन महिला उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ अम्मान, जॉर्डन
भारताचा ग्रीको रोमन मल्ल रोनक दाहियाने यू-17 वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये 110 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले तर तीन महिला मल्लांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
कांस्यपदकासाठी झालेल्या प्लेऑफ लढतीत रोनकने तुर्कीच्या इमरुल्लाह कॅपकनचा 6-1 अशा गुणफरकाने सहज मात केली. त्याच्या वजन गटातील व वयोगटातील जागतिक क्रमवारीत रोनक सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारताला त्याने पहिले पदक मिळवून दिले. तत्पूर्वी, रोनकला हंगेरीच्या झोल्टन झॅकोकडून उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. पण झॅकोला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. या गटात युक्रेनच्या इव्हान यान्कोवस्कीने अंतिम फेरीत झॅकोला तांत्रिक सरसतेच्या आधारे 13-4 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
महिलांमध्ये 43 किलो वजन गटात भारताच्या अदिती कुमारीने शानदार प्रदर्शन करीत युक्रेनच्या कॅरोलिना श्फेरीकवर 10-0 तर मरियम मोहमद अब्देलालवर 4-2 अशी मात करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिची उपांत्य लढत अलेक्सांड्रा बेरेझोवस्काइयाशी होणार आहे. महिलांच्या 57 किलो वजन गटात नेहाने एकही गुण न गमविता उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिने ग्रीकच्या मायरी मनीचा पराभव केल्यानंतर जॉर्जियाच्या मिरांडा कॅपानादझेचा पराभव केला. तिची उपांत्य लढत कझाकच्या अॅना स्ट्रॅटनशी होईल.
महिलांच्या 65 किलो गटात भारताच्या पुलकितने चीनच्या लिंग काईवर चीतपट विजय मिळविल्यानंतर ज्युलियाना कॅटान्झारोवर 9-0 असा एकतर्फी विजय मिळविला. इजिप्तच्या मारम इब्राहिम अलीविरुद्ध तिची उपांत्य लढत होईल.
भारताला आणखी एक पदक मिळविण्याची संधी असून 51 किलो गटात साईनाथ पारधीने रेपेचेज फेरीत स्थान मिळविले आहे. यासाठी त्याला दोन लढती जिंकाव्या लागतील. त्याची पहिली लढत अमेरिकेच्या डॉमिनिक मायकेल मुनारेटोविरुद्ध होणार असून ही लढत जिंकल्यास त्याची कांस्यपदकासाठी लढत कझाकचा मुसान येरासील किंवा इराणचा अबोलफझ्ल मेहरदाद कारामीगाई यापैकी एकाशी होईल.