अखिल शेरानला कांस्यपदक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्षभरातील निराशाजनक कामगिरीनंतर नेमबाज अखिल शेरानने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल नेमबाजीमध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावत निराशा बाजूला सारली.
महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्स प्रकारात आशी चोक्सी व निश्चल यांना अंतिम फेरी गाठता आली नाही तर रिदम सांगवानचे कांस्यपदक चिनी खेळाडूविरुद्धच्या 25 मी. स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील शूटऑफमध्ये थोडक्यात हुकले. अखिलने मात्र संयमी खेळ करीत भारताचे दुसरे पदक मिळवून देताना 452.6 गुण नोंदवले. त्याआधी पात्रता फेरीत त्याने 589 गुण नोंदवत सहावे स्थान मिळविले होते तर चैन सिंगने 592 गुण नोंदवत चौथे स्थान घेतले होते. मात्र अंतिम फेरीत त्याला सातवे स्थान मिळाले. अखिलने चीनचा ऑलिम्पिक सुवर्णजेत्या लियु युकुनला पराभूत केले. या प्रकारात हंगेरीच्या इस्तवान पेनीने सुवर्ण मिळविले. युकुनला या प्रकारात चौथे स्थान मिळाले. याआधी सोनम मस्करने महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात रौप्य मिळवून दिले आहे.