For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुस्तीपटू अमन सेहरावतला कांस्यपदक

06:58 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुस्तीपटू अमन सेहरावतला कांस्यपदक
Advertisement

पुरुषांच्या 57 किलो गटात मारली बाजी : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले तर भारताचे एकूण सहावे पदक

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

कुस्तीपटू अमन सेहरावतने शुक्रवारी शानदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. सेहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा 13-5 असा पराभव केला. यासह ऑलिम्पिकध्ये भारताच्या पदकांची संख्या 6 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंनी भारताला पदक मिळवून दिले आहे. अमनने हा वारसा कायम ठेवत यंदाच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची भारतीय कुस्तीची महान पंरपरा कायम ठेवली आहे.

Advertisement

 

अमन आशियाई चॅम्पियन राहिला असून 23 वर्षांखालील जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदकाची अपेक्षा होती, ती अमनने पूर्ण केली आहे. याआधी विनेश फोगाटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र अतिरिक्त वजनामुळे तिला सामन्यपूर्वीच अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत अमनचे हे पदक कुस्तीत भारतासाठी दिलासादायक बाब ठरले आहे.

21 वर्षीय कुस्तीपटूने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रभावी कामगिरी करत अंतिम 16 आणि उपांत्यपूर्व फेरीत बाजी मारली. उपांत्य फेरीत मात्र त्याला अव्वल मानांकित जपानच्या रेई हिगुचीकडून सरळ पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर शुक्रवारी 57 किलो गटात अमनची लढत प्युर्तो रिकोच्या व्रुझशी झाली. सामन्याच्या सुरुवातीलाच अमनला मैदानाबाहेर जाण्यास भाग पाडल्यानंतर क्रूझने कांस्यपदकाच्या लढतीत पहिला गुण मिळवला. मात्र, त्यानंतर अमनने झटपट पुनरागमन करत दोन गुण मिळवले. यानंतर दोघांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले आणि दोघांनीही वेगवान देवाणघेवाणीत एकमेकांना मागे टाकले आणि तीस सेकंदाच्या विश्रांतीपर्यंत भारतीय खेळाडूने 4-3 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या हाफमध्ये अमनने उत्कृष्ट सुरुवात करत क्रूझला ताबडतोब रोखत तीन गुणांची आघाडी मिळवली. यानंतर व्रुझच्या हाताला जखम झाली व त्याने वैद्यकीय मदत घेतली. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला. याचा फायदा घेत भारतीय कुस्तीपटूने आणखी दोन तांत्रिक गुण मिळवत 10-5 अशी आघाडी घेतली आणि लवकरच आपली आघाडी सात गुणांपर्यंत वाढवली. मध्यंतरी झालेल्या दुखापतीमुळे क्रूझला त्रास होत राहिला आणि अखेर भारतीय खेळाडूने 13-5 असा विजय मिळवला.

शनिवारी ऑलिम्पिकमधील भारताची शेवटची दावेदार रीतिका हुडा महिलांच्या फ्रीस्टाईल 76 किलो वजनी गटात आपल्या मोहिमेला सुरुवात करताना पदकतालिकेत भर घालण्याचे लक्ष्य ठेवेल.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सहावा कुस्तीपटू

अमन सेहरावत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता. के. डी. जाधव (1952 हेलसिंकीमध्ये ब्राँझ), सुशीलकुमार (बीजिंग 2008 मध्ये ब्राँझ आणि लंडन 2012 मध्ये रौप्य), योगेश्वर दत्त (लंडन 2012 मध्ये ब्राँझ), रवी दहिया (टोकियो 2020 मध्ये रौप्य) आणि बजरंग पुनिया (टोकियो 2020 मध्ये कांस्य) यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो देशातील सहावा पुरुष कुस्तीपटू ठरला आहे.

Advertisement
Tags :

.