For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भावा!सोशल मीडियावर फक्त आरसीबीची हवा

06:58 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भावा सोशल मीडियावर फक्त आरसीबीची हवा
Advertisement

ट्रॉफी उचलतानाच्या फोटोने रचला नवा विक्रम :  विराटसह अनेक दिग्गजाकडून कौतुकाचा वर्षाव 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने रविवारी महिला प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले. तब्बल 16 वर्षानंतर आरसीबीला चषक उंचावता आला आहे. विराट कोहली कर्णधार असताना आरसीबीला चषक उंचावता आला नव्हता पण आता स्मृती मानधनाने आरसीबीचा चषकाचा दुष्काळ संपवला आहे. आरसीबीच्या विजयानंतर देशभरात तसेच सोशल मीडियावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

Advertisement

या जेतेपदासह आरसीबीने एक अनोखा विक्रम देखील रचला आहे. आरसीबीची टीम जगभरात तिच्या चाहत्या वर्गासाठी ओळखली जाते. मागील 16 वर्षांत भलेही संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नसली तरी चाहते मात्र संघाला तेवढ्याच उत्साहाने सपोर्ट करतात. याचीच प्रचिती रविवारी मिळालेल्या विजयानंतर आली. आरसीबीने महिला प्रीमियर लीग जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक रेकॉर्ड बनवला आहे. आरसीबीच्या महिला टीमचा ट्रॉफी उचलतानाचा फोटो इंस्टाग्रामवर सर्वात जलद 10 लाख लाईक्स मिळवणारा फोटो बनला. संघाच्या सोशल मीडिया हॅन्डलने हा फोटो इंस्टाग्रामवर टाकताच त्याला अवघ्या 9 मिनिटांत 10 लाख लाईक्स मिळाल्या. यापूर्वीचे रेकॉर्ड आरसीबीचाच खेळाडू विराट कोहलीच्या नावे होते. त्याच्या फोटोला 10 मिनिटांत 10 लाख लाईक्स मिळाल्या होत्या. अवघ्या 9 मिनिटात एका पोस्टवर एक दशलक्ष लाईक्स पूर्ण करणारे आरसीबीचे सोशल मीडियावर खाते देशातील पहिलेच खाते ठरले आहे.

देशभरात जल्लोष

आरसीबीचा संघ म्हटले की चाहत्यांची रिघ पहायला मिळते. 16 वर्षापासूनचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी देशभरात एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. आरसीबीच्या चाहत्यांच्या आनंदाला पारवार नव्हता. व्हॉट्सअॅप स्टेट्सवर संघाच्या कामगिरीचे कौतुक केले जात होते तर इन्स्टा असो अथवा फेसबुक सगळीकडे चाहत्यांकडून आरसीबीच्या मुलींवर कौतुकाचा वर्षाव केला जात होता.

विराटचा व्हिडिओ कॉल अन् महिला खेळाडूंचा जल्लोष

आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने व्हिडिओ कॉल करून महिला संघाचे अभिनंदन केले. आरसीबी महिला संघाच्या विजयाने विराट कोहली खूपच आनंदी दिसत होता. विराट कोहलीशी व्हिडीओ कॉलवर काय बोलणे झाले, याबाबत स्मृतीने खुलासा केला आहे. मैदानातील गोंगाटामुळे मला विराट भैय्याचा आवाज ऐकू आला नाही. तो खूप आनंदी दिसत होता. तो गेल्या 16-17 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायला मिळाला. विराट कोहलीच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विजेतेपदानंतर आरसीबीचा संघ मालामाल

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने 8 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे दिल्लीला सलग दुसऱ्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला 6 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये देण्यात आले. गतवर्षीही विजेत्या मुंबई इंडियन्सला 6 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते.

इ साला कप नमदु - स्मृती मानधना

विजयानंतर स्मृती मानधनाने बोलताना आरसीबीच्या चाहत्यांना खास संदेश दिला. इंडियन प्रिमीयर लीग सुरु होण्यापूर्वी ‘इ साला कप नामदे’ असा नारा चाहत्यांकडून लगावण्यात येतो. ज्याचा अर्थ, या वर्षी कप आमचा आहे, असा होतो. मात्र आता ‘ई साला कप नमदू’ असं स्मृतीने म्हटलं आहे, याचा अर्थ या वर्षी कप आमचा झाला आहे. जिंकल्यानंतर भावना व्यक्त करताना माझ मन भरून आले आहे. पण मी एक गोष्ट सांगेन की, मला टीमचा अभिमान आहे. या स्पर्धेत योग्य वेळी आम्ही कमबॅक केले, याचा आम्हाला फायदा झाल्याचे स्मृती म्हणाली.

महिला प्रीमियर लीगमधील पुरस्कार विजेते

  • विजेता संघ - रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (6 कोटी रुपये)
  • उपविजेता संघ - दिल्ली कॅपिटल्स (3 कोटी रुपये)
  • उदयोन्मुख खेळाडू - श्रेयांका पाटील (आरसीबी, 5 लाख रुपये)
  • सर्वात मौल्यवान खेळाडू - दीप्ती शर्मा (यूपीडब्ल्यू, 5 लाख रुपये)
  • ऑरेंज कॅप - एलिस पेरी (आरसीबी, 5 लाख रुपये)
  • पर्पल कॅप - श्रेयांका पाटील (आरसीबी, 5 लाख रुपये)
  • सर्वाधिक षटकार - शेफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स, 5 लाख रुपये)
  • हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल - एस. सजना (मुंबई इंडियन्स, 5 लाख रुपये)
  • फेअर प्ले अवॉर्ड - रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (5 लाख रुपये)
  • अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू - सोफी मॉलिन्यू (आरसीबी, 2.5 लाख रुपये)
Advertisement
Tags :

.