ब्रिटीश महिलेवर दिल्लीत बलात्कार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीत पर्यटक म्हणून आलेल्या एका ब्रिटीश महिलेवर सामुहिक बलात्कार होण्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या महिपालपूर भागात एका हॉटेलात ही घटना घडल्याची माहिती दिल्ली पोलीसांनी दिली. दोन संशयितांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या घटनेविषयी माहिती भारतातील बिटीश उच्चायोगाला कळविण्यात आली असून पुढील तपास केले जात आहे. या महिलेचा प्रथम हॉटेलच्या लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला. या कृत्यात हॉटेलच्या हाऊसकिपींग कर्मचाऱ्याचा समावेश होता. त्यानंतर ही महिला हॉटेलमधील खोलीत आल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारा पुरुष तिच्या परिचयाचा होता. या दोघांचा परिचय सोशल मिडियावरुन झाला होता, अशी माहिती उपलब्ध झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दोन आरोपींचा सहभाग
या विनयभंग आणि बलात्कार प्रकरणात दोन आरोपींचा समावेश आहे. बलात्कार करणाऱ्याशी या महिलेची ओळख दीड महिन्यापूर्वी सोशल मिडियावर झाली होती. ही महिला दोन दिवसांपूर्वी गोव्याहून दिल्लीला पोहचली होती. ही महिला भारतात पोहचल्यानंतर आरोपी आणि तिने दिल्लीत एकमेकांना भेटण्याची योजना केली होती. या महिलेने गोव्याहून दिल्लीला आल्यानंतर महिपालपूर भागात हॉटेलात खोली बुक केली होती. आरोपीने या खोलीत येऊन तिच्यावर बलात्कार केला, असे म्हणणे तिने तक्रारीत मांडले आहे, अशी माहिती देण्यात आली.