For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News: ब्रिटिशकालीन जगबुडी पूलाची ओळख पुसणार, पाडकामाचे आदेश

03:34 PM May 15, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news  ब्रिटिशकालीन जगबुडी पूलाची ओळख पुसणार  पाडकामाचे आदेश
Advertisement
जुना जगबुडी पूल पाडण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर देण्यात आलेत
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील अखेरची घटका मोजणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरील रहदारीला गेल्या ४ वर्षांपासून कायमचा ब्रेक लागला आहे. जुना जगबुडी पूल पाडण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत.

यामुळे लवकरच जुना जगबुडी पूल जमीनदोस्त होणार असून पाडकामाची जबाबदारी महामार्ग चौपदरीकरणातील ठेकेदाराकडेच सोपवण्यात येणार असल्याचे समजते. या पाडकामानंतर ब्रिटिशकालीन पुलाची ओळख कायमची पुसली जाणार आहे.

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेतील ब्रिटिशकालीन जुना पूल महत्त्वाचा दुवा ठरला होता. दिवस रात्र हजारो वाहने या पुलावरून मार्गस्थ होत होती. या पुलावर अनेक प्राणांतिक अपघात देखील घडले आहेत. १९ मार्च २०१३ मध्ये महाकाली आरामबसला झालेल्या होत होता.

याचमुळे पुलाची उंची वाढवण्यासह नवा पूल उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. भीषण अपघातात ३९ जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले होते. या भीषण अपघातानंतरच जुन्या जगबुडी पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आला होता.
या दुर्घटनेनंतर अनेक मंत्र्यांकडून आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. दरवर्षी अतिवृष्टीदरम्यान पुलावरून पाणी वाहू लागताच महामार्ग वाहतुकीसाठी ठप्पही होत होता. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान सर्वप्रथम भरणे येथे नवा पूल उभारण्यास प्राधान्य देण्यात आले.
नव्या जगबुडी पुलाचे बांधकाम पूर्ण होताच गेल्या ४ वर्षांपासून याच पुलावरून वाहने धावत आहेत. जुन्या जगबुडी पुलाचा वापर पूर्णतः थांबला आहे. नव्या जगबुडी पुलालगतच जोडपूल देखील उभारण्यात आल्याने वाहनचालकांची चिंता कायमची दूर झाली आहे.
सद्यस्थितीत दोन्ही पुलावरून सुरू असणाऱ्या वाहतुकीमुळे वाहनचालकांचा प्रवास विनाअडथळा सुरू आहे. नव्या जगबुडी पुलाच्या उभारणीनंतर पादचाऱ्यांच्या रहदारीचा मार्गच बंद झाल्याने जुन्या जगबुडी पुलावरील पादचाऱ्यांच्या रहदारीलाही कायमचाच 'ब्रेक' लागला आहे.
धोकादायक स्थितीतील जुना जगबुडी पूल कोसळून नजिकच्या नव्या पुलाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महाड तालुक्यातील सावित्री पुलापाठोपाठ भरणे येथील जुना जगबुडी पूलही जमीनदोस्त केला जाणार आहे.
पुलाच्या पाडकामाबाबत गतवर्षीच रितसर वरिष्ठ पातळीवर प्रस्तावही पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली असून जुना जगबुडी पूल पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच चौपदरीकरणातील ठेकेदारमार्फतच पुलाच्या पाडकामाची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. यामुळे जुन्या जगबुडी पुलाबाबतच्या प्रवाशांसह पादचाऱ्यांच्या अनेक आठवणी विस्मृतीस जाणार आहेत
लवकरच पुलाच्या पाडकामाची कार्यवाही होईल
भरणे जुना जगबुडी पूल पूर्णतः धोकादायक स्थितीत आहे, हा पूल कोसळल्यास नजीकच्या पुलाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येत्या काही दिवसातच महामार्ग चौपदरीकरणातील ठेकेदारामार्फतच पूल जमीनदोस्त केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Advertisement
Advertisement
Tags :

.