ब्रिटीश उच्चायुक्ताचा भारताकडून विरोध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ब्रिटनच्या पाकिस्तानातील उच्चायुक्त जेन मेरिऑट यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरला दिलेल्या भेटीचा भारताने कठोर शब्दांमध्ये निषेध केला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा कायदेशीर भाग असून त्यावर पाकिस्तानने बेकायदेशी कबजा मिळविला आहे. अशा स्थितीत ब्रिटनच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांनी या प्रदेशाला भेट देऊन समतोल बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. भारत या भेटीचा तीव्र निषेध करीत आहे, असे निवेदन परराष्ट्र व्यवहार विभागाकडून दिले गेले.
पाकिस्तानातील ब्रिटीश उच्चायुक्तांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट देऊन भारताच्या सार्वभौमत्वाचा अवमान केला आहे. हा भारताच्या प्रभुसत्तेत केलेला हस्तक्षेप आहे. असा हस्तक्षेप भारताला अस्वीकार्य असून आम्ही या कृतीचा तीव्र निषेध करीत आहोत. भारताने या संदर्भात ब्रिटीश सरकारकडे आपला आक्षेप नोंदविला असून दक्षता घेण्यात यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.