ब्रिटनचे ‘शूटआऊट’, भारत उपांत्य फेरीत
पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनवर 4-2 ने विजय : ‘द वॉल’ श्रीजेशची दमदार कामगिरी
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लावण्यात आला. भारताने शूटआऊटमध्ये ब्रिटनला 4-2 ने पराभूत केले. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शूटआऊटमध्ये त्याने इंग्लंडचे दोन गोल वाचवले. कर्णधार हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय आणि राजकुमार पाल यांनी गोल केले. तर, ब्रिटनकडून जेम्स अल्बेरी आणि जॅक वॉलेस यांनी गोल केले. आता, भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होईल.
रविवारी भारत व ग्रेट ब्रिटन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. बलाढ्या ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सुरुवातीपासून शानदार खेळ केला. पहिल्या सत्रात भारताला एकही गोल करता आला नाही. यानंतर 17 व्या मिनिटाला अमित रोहितदासला रेड कार्ड मिळाल्याने भारताला मोठा धक्का बसला. त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि उर्वरित सामना भारताला 10 खेळाडूंसह खेळावा लागला. यानंतर भारताला 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचे हरमनप्रीतने सोने करत भारताला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. मात्र, ब्रिटनने थोड्याच वेळात बरोबरी साधली. 27 व्या मिनिटाला ली मॉर्टनने गोल केला.
उर्वरित दोन सत्रात दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. विशेषत: ब्रिटनच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर सातत्याने आक्रमणे केली पण गोलरक्षक श्रीजेशने उत्तम बचाव करत हे सारे प्रयत्न हाणून पाडले. यामुळे निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत संपला व सामन्याच्या निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा वापर करण्यात आला. यानंतर शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करताना हा सामना 4-2 असा जिंकला व थाटात उपांत्य फेरी गाठली. टीम इंडियाचा सेमी फायनलचा सामना दि. 6 ऑगस्ट रोजी होईल.
भारताच्या अमित रोहिदासला रेड कार्ड
सामन्यातील 17 व्या मिनिटाला पंचांनी भारताच्या अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवत बाहेर केले. रोहिदासच्या स्टीकने ब्रिटनचा खेळाडू जखमी झाला. सामन्यादरम्यान अमितला घेरण्यासाठी ब्रिटनचे दोन खेळाडू प्रयत्न करत होते, यावेळी चेंडू पुढे ढकलत असताना अमितच्या हातातील हॉकी स्टीक ही थोडी उंच झाली आणि ती मागे असलेल्या ब्रिटनच्या खेळाडूला लागली. त्यामुळे तो तिथेच मैदानात पडला. मॅच रेफ्रींनी रोहिदासला ब्रिटिश खेळाडूच्या डोक्यात जाणीवपूर्वक हॉकी स्टिकने मारल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूला रेड कार्ड देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमितला रेड कार्ड दाखवत बाहेर केल्यानंतर जवळपास 43 मिनिटे भारताला दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. पण, एका खेळाडू कमी असूनही भारतीय संघाने सडेतोड खेळ करत शानदार विजय मिळवला.
पीआर श्रीजेशचा उत्तम बचाव
भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आपले शेवटचे ऑलिम्पिक खेळत आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ग्रेट ब्रिटनने आक्रमक खेळी केली पण या आक्रमक खेळीला रोखण्याचे काम श्रीजेश आणि बचाव फळीच्या खेळाडूंनी केले. श्रीजेशच्या बचावामुळे ब्रिटनला गोल करता आले नाहीत. परिणामी मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. तिथे भारतासाठी दोन गोल श्रीजेशने रोखले.
पेनल्टी शूटआऊटचा थरार
- ब्रिटनने पहिला शूटआउट घेतला, यामध्ये अल्बरी जेम्सीने गोल केला.
- भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्यानेही गोल केला.
- इंग्लंडसाठी वॉलेस दुसरा शॉट घेण्यासाठी आला आणि त्याने गोल केला.
- भारताकडून सुखजीत आला आणि त्यानेही शानदार गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.
- तिसऱ्या प्रयत्नात इंग्लंडसाठी क्रोनर आला, पण गोल करण्यात तो चुकला.
- ललित उपाध्यायने भारतासाठी तिसऱ्या प्रयत्नात गोल करत 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
- चौथ्या प्रयत्नातही इंग्लंडला गोल करता आला नाही. भारताचा गोलरक्षक श्रीजेशने ब्रिटीश खेळाडूसमोर उभे राहून बचाव केला.
- भारतासाठी राजकुमार पालने चौथ्या प्रयत्नात गोल केला. अशाप्रकारे टीम इंडियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.