ब्रिटन क्षेपणास्त्रांसाठी युक्रेनला 14 हजार कोटी रुपये देणार
5,000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची खरेदी होणार
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर युक्रेनला 14 हजार कोटी रुपयांची मदत देणार आहेत. या आर्थिक मदतीतून युक्रेन 5,000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रs खरेदी करेल. ही क्षेपणास्त्रs ब्रिटनमधील बेलफास्टमध्ये तयार केली जाणार असून संरक्षण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या मदतीची घोषणा करण्यापूर्वी एक दिवस ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी झेलेन्स्की यांच्या भेटीवेळी 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच अमेरिका अनेक दशकांपासून आमचा विश्वासू भागीदार असून भविष्यातही तो तसाच राहील, असे युक्रेन युद्धाच्या मुद्यावर युरोपीय देशांच्या संरक्षण शिखर परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी सांगितले. या बैठकीला 15 देशांचे राष्ट्रप्रमुख, तुर्कीचे परराष्ट्रमंत्री, नाटोचे सरचिटणीस, युरोपियन युनियनचे अध्यक्ष आणि युरोपियन कौन्सिलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आमच्या सरकारची प्राथमिकता ब्रिटीश लोकांना सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या हितांचे रक्षण करणे ही असल्याचे स्टार्मर यांनी म्हटले आहे. आमचा प्रयत्न युक्रेनला मजबूत स्थितीत आणण्याचा आहे. आम्ही युक्रेनला आमचा पाठिंबा दुप्पट करत आहोत. शिखर परिषदेतील नेत्यांनी युक्रेनला लष्करी मदत सुरू ठेवण्यास आणि रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यास सहमती दर्शविली. कोणत्याही शांतता चर्चेत युक्रेनचा समावेश असला पाहिजे. कोणत्याही करारात रशियाचा समावेश करणे आवश्यक असेल, परंतु रशियाने यापूर्वी अनेकवेळा करारांचे उल्लंघन केले आहे, अशा परिस्थितीत आपल्याला युक्रेनला दिलेल्या हमींवर परिणाम होऊ नये याची खात्री करावी लागेल. पुढील संघर्ष टाळण्यासाठी हमी आवश्यक आहेत, असे भाष्यही स्टार्मर यांनी सदर सुरक्षा परिषदेमध्ये केले होते. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांनी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शविली आहे. ही योजना अमेरिकेसमोर ठेवली जाणार आहे.