हुतीविरोधात सौदीला मदत करणार ब्रिटन
आकाशातच लढाऊ विमानांमध्ये इंधन भरणार : युद्धामुळे येमेनमधील 1.2 लाख बेघर
वृत्तसंस्था, रियाध
येमेनमध्ये हुती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यातील लढाई तीव्र झाली आहे. याचदरम्यान ब्रिटनने सौदी अरेबियाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन सौदी अरेबियाला एअर-टू-एअर रिफ्यूलिंगसाठी टँकर उपलब्ध करणार असल्याचे पंतप्रधान एंडी बर्नहॅम यांनी सांगितले आहे. म्हणजेच हवेत उड्डाणावेळी सौदीच्या लढाऊ विमानांमध्ये इंधन भरता येऊ शकणार आहे. हुती अन् सौदी अरेबियातील संघर्षाचा प्रभाव सर्वसामान्य लोकांवर पडत आहे. या संघर्षामुळे आतापर्यंत 1.2 लाखाहून अधिक येमेनचे लोक बेघर झाले आहेत. मागील काही दिवसांमध्ये 3 हजारांहून अधिक येमेनी शरणार्थी लाल सागर ओलांडून जिबूतीमध्ये पोहोचले आहेत.
ब्रिटन पाठविणार टँकर विमान
सौदी अरेबियाच्या मदतीसाठी ब्रिटन स्वत:च्या रॉयल एअर फोर्सचे वॉयजर टँकर विमान पाठवू शकतो. हे विमान सायप्रसमधील अक्रोटिरी वायुतळावरून काम करणार आहे. वॉयजर विमानाचे काम आकाशात उड्डाण करत असलेल्या लढाऊ विमानांमध्ये इंधन भरणे आहे. यामुळे लढाऊ विमान धावपट्टीवर न उतरता दीर्घकाळ उड्डाण करू शकते. ब्रिटनच्या वायुदलाकडे अशी 9 वॉयजर विमाने आहेत. यातील 8 सैन्यवापरासाठी असून एक विमान सामान्य म्हणजेच नागरी नोंदणीयुक्त आहे. आवश्यकता भासल्यास हे विमान देखील सैन्यकार्यासाठी वापरले जाऊ शकते. सौदी अरेबियाला देण्यात येणारी ही मदत काही आठवड्यांसाठी असणार आहे. ब्रिटनने चालू वर्षात यापूर्वीच सौदी अरेबियामध्ये स्काय सेबर हवाई सुरक्षा प्रणाली तैनात केली आहे. ही प्रणाली शत्रूच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचावासाठी वापरली जाते.
हुतींचा महत्त्वाच्या बेटांवर कब्जा
येमेनमधील हुती बंडखोरांनी चालू महिन्यात लाल समुद्राच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत बाब-अल-मंदब सामुद्रधुनीनजीकच्या भागांवर कब्जा केला आहे. ही सामुद्रधुनी लाल समुद्राला एडनच्या उपसागराशी जोडते. याचमुळे या भागातील लढाईचा प्रभाव सागरी मार्गांवरही पडतो. हुतींच्या या आघाडीनंतर सौदी अरेबियाने किनारी भागांमध्ये शेकडो हवाई हल्ले केले आहेत. दुसरीकडे सौदी अरेबियाच्या शहरांवर आणि तेलप्रकल्पांवर हुतींकडून ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत.
जिबूतीची भूमिका
येमेनशी समुद्राने जोडले गेलेल्या जिबूतीने हुती बंडखोर आणि सौदी अरेबियातील या युद्धात सामील होऊ इच्छित नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु जिबूती हा आफ्रिकेतील सर्वाधिक सैन्य उपस्थिती असलेल्या देशांपैकी एक आहे. 2003 पासून अमेरिका येथे कॅम्प लेमोनियर नावाचा मोठा सैन्यतळ संचालित करत आहे. येथे चीनचा देखील मोठा सैन्यतळ आहे.