भारतासह 56 देशांची माफी मागण्यास ब्रिटन तयार
पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांची भूमिका
लंडन : ब्रिटनचा गुलामांच्या अटलांटिक व्यापारातील सहभाग आणि त्याच्या ऐतिहासिक परिणामांबद्दल औपचारिक माफी मागण्याच्या मागणीवर चर्चा करण्यास ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, गुलामगिरीबद्दल आर्थिक नुकसानभरपाई देण्यास त्यांनी नकार दिला आहे. राष्ट्रकुलच्या 56 सदस्य देशांशी संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांत हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. ‘द गार्डियन“मधील लेखात बर्नहॅम यांनी गुलामगिरीच्या वारशाने प्रभावित झालेल्या देशांशी औपचारिक चर्चा सुरू करण्याची तयारी दर्शवली. ब्रिटिश सरकारच्या वतीने माफी मागण्याच्या मागणीवर या चर्चेत विचार केला जाईल, असे त्यांनी म्हटले. गुलामांच्या व्यापारामुळे झालेल्या वेदना आणि यातनांबद्दल त्यांनी दु:ख व खेदही व्यक्त केला. मात्र, आजच्या ब्रिटिश नागरिकांना ऐतिहासिक काळातील कृत्यांसाठी जबाबदार धरता येणार नाही, असे सांगत बर्नहॅम यांनी आर्थिक भरपाईची मागणी फेटाळली. त्याऐवजी आर्थिक अडचणीत असलेल्या राष्ट्रकुल देशांना कर्जफेडीसाठी अधिक कालावधी आणि अनुकूल व्याजदर मिळवून देण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देण्याचे संकेत त्यांनी दिले. अँटीग्वा आणि बार्बुडा येथे होणाऱ्या राष्ट्रकुल नेत्यांच्या बैठकीत गुलामगिरीबद्दल माफी आणि नुकसानभरपाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्मयता आहे. पॅरिबियन देशांसह आफ्रिकेतील काही देश ब्रिटनकडे ऐतिहासिक अन्यायाची कबुली आणि भरपाईची मागणी करत आहेत. ब्रिटनच्या भूमिकेतील बदलाचे स्वागत करतानाच, आर्थिक नुकसानभरपाईबाबतची मागणी कायम असल्याचे पॅरिबियन नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
