सीरियात ब्रिटन-फ्रान्सचा एअर स्ट्राइक
इस्लामिक स्टेटच्या शस्त्रास्त्र साठ्याला केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटन आणि फ्रान्सच्या वायुदलांनी सीरियात एक संयुक्त हवाई अभियान राबविले आहे. या अभियानात इस्लामिक स्टेटच्या एका भूमिगत शस्त्रास्त्र साठ्याला लक्ष्य करण्यात आले आहे. या अभियानाची माहिती ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. सीरियाच्या मध्य भागातील प्राचीन शहर पल्मायरा येथील पर्वतीय भागात इस्लामिक स्टेटने शस्त्रास्त्रांचा साठा लपवून ठेवला होता. या भागात कुठलीही नागरी वस्ती नसल्याने एअरस्ट्राइकमध्ये नागरी हानी होण्याचा धोका नव्हता.
ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या टायफूर एफजीआर4 लढाऊ विमानांनी फ्रान्सच्या विमानांसोबत मिळून ही कारवाई केली आहे. ब्रिटिश विमानांमध्ये वोयेजर रिफ्यूलिंग टँकरद्वारे आकाशातच इंधन भरण्यात आले. या विमानांनी पेववे 5 गायडेड बॉम्बद्वारे भूमिगत ठिकाणाच्या प्रवेश भुयारांना लक्ष्य केले. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओत टायफून विमानांचे आकाशातील रिफ्यूलिंग दिसून येते. हे अभियान यशस्वी राहिले असून सर्व ब्रिटिश विमाने सुरक्षित परतली आहेत. तर कारवाईच्या परिणामांविषयी विस्तृत चौकशी सध्या सुरू आहे.

ब्रिटिश संरक्षणमंत्र्यांचे वक्तव्य
ही कारवाई ब्रिटिनची नेतृत्वक्षमता दर्शविते. आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून इस्लामिक स्टेटला रोखणे आणि मध्यपूर्वेतील त्याच्या धोकादायक आणि हिंसक विचारसरणीला संपविण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आमच्या जीवनशैलीला धोका निर्माण करणाऱ्या धोकादायक दहशतवाद्यांना संपविण्यासाठी हे अभियान होते असे ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी सांगितले आहे.
आयएस विरोधातील लढाई
इस्लामिक स्टेटने 2014-19 पर्यत सीरिया आणि इराकच्या मोठ्या भूभागांवर कब्जा करत क्रूर शासन चालविले होते. 2019 मध्ये बघुजच्या लढाईत इस्लामिक स्टेटचा सैन्य स्वरुपात पराभव झाला होता. परंतु अद्याप इस्लामिक स्टेट काही भागांमध्ये सक्रीय असल्याने ही दहशतवादी संघटना पुन्हा मोठे रुप धारण करण्याचा धोका आहे. याचमुळे आंतरराष्ट्रीय आघाडी (ज्यात ब्रिटन आणि फ्रान्स सामील आहे) सीरियाच्या आकाशात गस्त घालते. ब्रिटनचे ऑपरेशन शेडर याचाच हिस्सा आहे. पाश्चिमात्य देशांचे वायुदल इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर नजर ठेवते आणि गरज भासल्यास हल्ला करते.